India Women vs Sri Lanka Women, Final : 2025 मध्ये होणाऱ्या महिला वर्ल्ड कपपूर्वी भारताच्या पोरी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्रिकोणी मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 7 गडी गमावून 342 धावा केल्या. कोलंबोच्या मैदानावर स्मृती मानधनाने तिच्या धमाकेदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि 101 चेंडूत 116 धावांची शानदार खेळी खेळली. मानधनाने फलंदाजीने धुमाकूळ घातला, तर स्नेहा राणा आणि अमनजोत कौर यांची गोलंदाजीत जादू पाहायला मिळाली.
श्रीलंकेचा संघ 245 धावांवर ऑलआऊट...
343 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. हसिनी परेरा तिचे खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतली. पण, कर्णधार चामारी अटापट्टूने अर्धशतक झळकावले. स्नेहा राणाने तिला क्लीन बोल्ड करून आऊट केले. निलाक्षी डी सिल्वारने 41 चेंडूत 48 धावांची दमदार खेळी खेळली, पण तिला दुसऱ्या टोकाच्या इतर फलंदाजांकडून साथ मिळू शकली नाही आणि संपूर्ण संघ 245 धावांवर ऑलआउट झाला. गोलंदाजीत, स्नेहा राणाने 9.2 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 38 धावा देत 4 विकेट तर अमनजोत कौरने 3 विकेट्स घेतल्या.
स्मृती मानधनाने रचला विजयाचा पाया...
विजेतेपदाच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रतीका रावल आणि स्मृती मानधना यांनी कर्णधाराचा निर्णय पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले. पहिल्या विकेटसाठी 14.5 षटकांत 70 धावा केल्या. प्रतीकाने 49 चेंडूत 36 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना, हरलीन देओलने 47 धावा केल्या आणि मानधनासोबत दुसऱ्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी केली. मानधनाने 101 चेंडूंचा सामना करत 116 धावांची शानदार खेळी खेळली. या खेळीदरम्यान स्मृतीने 15 चौकार आणि दोन षटकार मारले. कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 चेंडूत 41 धावा केल्या तर जेमिमा रॉड्रिग्जने 29 चेंडूत 44 धावा केल्या. दीप्ती शर्माने शेवटच्या षटकांमध्ये 14 चेंडूत नाबाद 20 धावा करत संघाला एकूण 342 धावांपर्यंत पोहोचवले.
हे ही वाचा -
