ICC Prize Money U19 World Cup 2026 : अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवत भारताने सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप उंचावला. या विजयासह भारत हा सर्वाधिक वेळा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणारा संघ ठरला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना न हरता अजिंक्यपद पटकावलं.
भारताचा ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने 50 षटकांत 9 विकेट्स गमावत तब्बल 411 धावांचा डोंगर उभा केला. वैभव सूर्यवंशी ज्याने अवघ्या 80 चेंडूमध्ये 175 धावांची वादळी खेळी खेळली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ पूर्णपणे दबावाखाली दिसला आणि सामना सुरुवातीपासूनच भारताच्या बाजूने झुकलेला राहिला. कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत वर्ल्ड चॅम्पियन झाली.
ICC कडून प्राइज मनी नाही
इतक्या मोठ्या यशानंतरही भारतीय संघाला आयसीसीकडून कोणतीही अधिकृत प्राइज मनी मिळणार नाही. कारण आयसीसी अंडर-19 मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप ही एक डेव्हलपमेंटल स्पर्धा आहे. या स्पर्धेचा उद्देश तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव देणे, त्यांची कौशल्ये विकसित करणे आणि भविष्यासाठी तयार करणे हा आहे. त्यामुळे या स्पर्धेत आयसीसीकडून कॅश प्राइज दिलं जात नाही. मागील आवृत्त्यांमध्येही हीच परंपरा राहिली आहे.
BCCI कडून मोठ्या बक्षिसाची शक्यता
मात्र, यामुळे भारतीय खेळाडूंनी निराश होण्याचं कारण नाही. कारण अशा ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआय नेहमीच आपल्या खेळाडूंना भरघोस बक्षीस देते. 2024 च्या अंडर-19 वर्ल्ड कप विजयानंतर प्रत्येक खेळाडूला 30 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं होतं. तसेच 2025 च्या महिला अंडर-19 टी20 वर्ल्ड कप विजयानंतर संपूर्ण संघासाठी 5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे यावेळीही बीसीसीआयकडून खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कोचिंग टीमसाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.
हे ही वाचा -
