INDW vs ENGW U-19 T20 WC : भारताच्या अंडर 19 महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर भारतीय संघानं नाव कोरलं आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषकाच्या (Under-19 Women T20 World Cup 2023) अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सच्या फरकाने मात देत विश्वचषकावर भारतीय संघाचं नाव कोरलं आहे. आधी गोलंदाजी निवडून भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं. ज्यानंतर 69 धावाचं माफक आव्हान केवळ तीन विकेट्सच्या बदल्यात 14 षटकात पूर्ण करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे. 






तर भारत विरुद्ध इंग्लंड या फायनलच्या सामन्याचा विचार करता सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला स्वस्तात रोखून निर्धारीत लक्ष्य पार करण्याचा भारताचा डाव होता. कर्णधाराच्या निर्णयाला साजेशी खेळी करत भारतीय महिलांनी सुरुवातीपासून इंग्लंडच्या खेळाडूंना तंबूत धाडणं सुरु ठेवलं. 17.1 षटकांत संपूर्ण इंग्लंडचा संघ 68 धावांवर सर्वबाद केलं. यावेळी भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम गोलंदाजी केली. यामध्ये तीतस साधूने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकांत केवळ 6 धावा देत दोन विकेट्सही घेतल्या. अर्चना देवी, पार्शवी चोप्रा यांनीही प्रत्येकी दोन मन्नत कश्यप, शेपाली वर्मा आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. इंग्लंडकडून रॅना हिने सर्वाधिक 19 धावा केल्या. 


तीन विकेट्स गमावत लक्ष्य केलं साध्य


120 चेंडूत 69 धावाचं माफक लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी आल्या आल्या स्फोटक खेळी सुरु केली. एक चौकार आणि एक षटकार ठोकून कॅप्टन शेफाली 15 धावांवर तंबूत परतली. सेमीफायनलमध्ये कमाल कामगिरी करणारी श्वेताही 5 धावा करुन बाद झाली. पण नंतर सौम्या तिवारी आणि गोगंदी त्रिशा यांनी एक चांगली भागिदारी करत भारताचा विजय पक्का केला. त्रिशा 24 धावा करुन बाद झाली. पण तोवर भारत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. सौम्याच्या नाबाद 24 धावांच्या जोरावर भारतानं 14 षटकात 69 धावा करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे. 


भारताची विश्वचषकातील कामगिरी


आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारताच्या कामगिरीचा विचार करता सुरुवातीपासून भारताने चांगली कामगिरी केली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यानंतर स्पर्धेत एकही सामना न गमावलेल्या न्यूझीलंडला भारतानं आठ विकेट्स राखून मात देत सामना जिंकला आणि फायनलमध्ये प्रवेश मिळवला. दुसरीकडे इंग्लंड संघाचा विचार करता त्यांनीही आपल्या नावाला साजेशी खेळी सुरुवातीपासून केली होती. सेमीफायनलमध्ये त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान होतं, जे देखील त्यांनी पार करत फायनल गाठली. ज्यानंतर फायनलमध्ये एक सोपा विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरलं आहे.  


हे देखील वाचा-