Sri Lanka A vs India A 2nd Unofficial Test : ध्रुव जुरेलच्या दमदार नेतृत्वाखाली इंडिया ए संघाने श्रीलंका एविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना तब्बल 10 विकेट्सनी जिंकत मालिका 1-0 अशी आपल्या नावावर केली. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत श्रीलंका ए संघावर संपूर्ण वर्चस्व गाजवले. या विजयात साई सुदर्शन आणि गुरनूर बरार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः साई सुदर्शनच्या शानदार शतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली, तर गोलंदाजांनी दुसऱ्या डावात श्रीलंका ए संघाला गुडघे टेकायला भाग पाडले.

Continues below advertisement

साई सुदर्शनचं शतक

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंडिया एने 9 बाद 543 धावा उभारल्या. साई सुदर्शनने अप्रतिम फलंदाजी करत 168 धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंका एच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. सुदर्शनला इतर फलंदाजांचीही चांगली साथ मिळाली. देवदत्त पडिक्कलने 94 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि शतक हुकले. कर्णधार ध्रुव जुरेलने 53 धावा करत जबाबदारीची फलंदाजी केली. सारांश जैनने 70 धावांचे मौल्यवान योगदान दिले, तर शेख रशीदने 45 धावा करून डावाला मजबुती दिली.

Continues below advertisement

श्रीलंका ए संघ पहिल्या डावात 366 धावांवर गारद

भारताच्या 543 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंका एचा पहिला डाव 366 धावांवर आटोपला. भारतीय गोलंदाजांनी सातत्यपूर्ण मारा करत प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोठी भागीदारी उभारू दिली नाही. त्यामुळे इंडिया एला पहिल्या डावात तब्बल 177 धावांची आघाडी मिळाली.

गुरनूर ब्रारची घातक गोलंदाजी

पहिल्या डावातील मोठ्या आघाडीनंतर भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात आणखी आक्रमक गोलंदाजी केली. श्रीलंका एचा संपूर्ण संघ केवळ 209 धावांत माघारी धाडण्यात आला. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि शिस्तबद्ध मारा करत प्रतिस्पर्धी संघावर सतत दबाव कायम ठेवला. भारताच्या या दणदणीत विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार. गुरनूरने श्रीलंकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकूच दिले नाही. पहिला डाव 4 विकेट आणि दुसरा डावात 6 विकेट घेत, गुरनूरने सामन्यात एकूण 10 बळी घेत श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 209 धावांवर गुंडाळला.

33 धावांचे लक्ष्य सहज पार

दुसऱ्या डावानंतर इंडिया एसमोर विजयासाठी केवळ 33 धावांचे लक्ष्य होते. भारताच्या सलामीवीरांनी कोणतीही जोखीम न घेता हे लक्ष्य सहज गाठले. संघाने एकही विकेट न गमावता 36 धावा करत 10 विकेट्सनी शानदार विजय मिळवला. साई सुदर्शनने दुसऱ्या डावातही नाबाद 25 धावांची खेळी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंडिया एने सर्वच विभागांत सरस कामगिरी केली. फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली, गोलंदाजांनी दोन्ही डावांत प्रभावी मारा केला आणि क्षेत्ररक्षकांनीही उत्कृष्ट साथ दिली. परिणामी ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली भारताने मालिका 1-0 अशी जिंकत आगामी आव्हानांसाठी आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.

हे ही वाचा -

IND VS ENG 3rd T20 Vaibhav Sooryavanshi : मँचेस्टरमध्ये नुसती झलक दाखवली, आता नॉटिंगहॅममध्ये होणार खरा राडा; वैभव सूर्यवंशी पुन्हा कधी अॅक्शनमध्ये दिसणार? वाचा A टू Z