India vs Sri Lanka Asia Cup 2025 : भारताने श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये नाट्यमय विजय मिळवत विजयाची घोडदौड सुरूच ठेवली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 202 धावा केल्या. प्रत्युत्तर श्रीलंकेनेही नेमक्या 20 षटकात 202 धावा करून सामना बरोबरीत आणला. त्यामुळे निकाल सुपर ओव्हरवर गेला आणि अखेर भारताने बाजी मारली. मात्र, सामन्याच्या शेवटच्या षटकातच भारताला थेट विजयाची संधी होती, पण अक्षर पटेल आणि हर्षित राणा यांच्या चुकांमुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
शेवटच्या 6 चेंडूंवर 12 धावांची गरज, हर्षित राणाच्या 20 षटकात काय घडलं?
श्रीलंकेने 19 षटकांत 4 गडी गमावून 191 धावा केल्या होत्या. पथुम निसांका शतक ठोकून एका टोकाला ठाम उभा होता. शेवटच्या 6 चेंडूंवर 12 धावांची गरज होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने जिंकण्यासाठी हर्षित राणावर जबाबदारी टाकली. राणाने पहिल्याच चेंडूवर 107 धावांवर खेळणाऱ्या निसांकाला आऊट करून खळबळ उडवून दिली. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्यावर 1 बाय मिळाला. आता 3 चेंडूत 9 धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर दासुन शनाकाने 2 धावा काढल्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार ठोकला. आता शेवटच्या चेंडूवर 3 धावा हव्या होत्या. याच क्षणी अक्षर पटेलकडून मिसफिल्ड झाली आणि श्रीलंकाने सहज 2 धावा घेत सामना टाय केला.
अक्षर पटेल आणि हर्षित राणाची चूक
शेवटच्या चेंडूपूर्वी सूर्यकुमार यादव, हर्षित राणा आणि शुभमन गिल यांच्यात चर्चा झाली होती. शनाकाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण टायमिंग चुकला. फलंदाजांनी पटकन एक धाव पूर्ण केली. चेंडू अक्षर पटेलकडे गेला, पण त्यांनी तो नीट पकडला नाही. त्यामुळे श्रीलंकाई फलंदाजांनी दुसरी धाव सहज पूर्ण केली. जर अक्षरच्या हातात चेंडू आला असता तर रनआऊटची संधी होती आणि भारताला थेट विजय मिळाला असता. पटेलने चेंडू राणाकडे फेकला, पण त्यांनीही नीट पकडला नाही. पण श्रीलंकेने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे सामना थेट सुपर ओव्हरमध्ये गेला आणि तिथे भारताने बाजी मारली.
हे ही वाचा -