India vs South Africa U19 ODI Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 2026 च्या अंडर-19 विश्वचषकापूर्वी त्याने केलेली ही कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या अंडर-19 यूथ वनडे मालिकेत वैभवने अवघ्या तीन डावांत 206 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे, कर्णधार म्हणून मैदानात पहिल्यांदाच उतरून त्याने भारताला 3-0 असा मालिका विजय मिळवून दिला आणि प्लेयर ऑफ द सीरिज हा मानही पटकावला. त्यामुळे आता एकच प्रश्न चर्चेत आहे, वैभवची कर्णधारपदाची धुरा कायम ठेवावी का?

Continues below advertisement

3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   

आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत वैभव सूर्यवंशीकडे भारतीय अंडर-19 संघाची कमान सोपवण्यात आली होती. पहिल्या सामन्यात तो केवळ 11 धावांवर बाद झाला आणि निराशा झाली, तरीसुद्धा त्याच्या नेतृत्वाखाली भारताने सामना जिंकला. दुसऱ्या वनडेमध्ये वैभवने अवघ्या 24 चेंडूमध्ये आक्रमक 68 धावा ठोकत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात 74 चेंडूमध्ये झंझावाती 127 धावा करत त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Continues below advertisement

आयुषच्या जागी वैभव?

अंडर-19 विश्वचषकाच्या तोंडावर वैभवची ही कामगिरी टीम इंडियासाठी मोठी दिलासादायक ठरली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर्णधारपदाची जबाबदारी असतानाही त्याच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम झाला नाही. दुसरीकडे, मागील काही स्पर्धांमध्ये अंडर-19 आशिया कप तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील यूथ वनडे मालिकेत आयुष म्हात्रेची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती.

अंडर-19 आशिया कपमध्ये आयुषने पाच डावांत अनुक्रमे 4, 38, 14, 7 आणि 2 धावा केल्या होत्या. पाचही सामने अपयशी ठरल्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्याची मागणीही होऊ लागली होती. तरीसुद्धा, अंडर-19 विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या संघात आयुषलाच कर्णधारपद देण्यात आले आहे. सध्याच्या दक्षिण आफ्रिका मालिकेत तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे बाहेर होता.

आता वैभवने दाखवलेली जबरदस्त कामगिरी आयुषवर दबाव वाढवणारी ठरू शकते. जर आयुष अंडर-19 विश्वचषकात कर्णधार म्हणून खेळताना अपेक्षित सुधारणा दाखवू शकला नाही, तर स्पर्धेनंतर वैभव सूर्यवंशीकडे भारतीय अंडर-19 संघाचे कर्णधारपद सोपवले जाऊ शकते.

सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत वैभवकडे कर्णधारपद देण्याचे कारण म्हणजे आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा हे दोघेही पूर्णपणे तंदुरुस्त नव्हते. मात्र विश्वचषकाच्या संघात दोघांचाही समावेश आहे. जर हे दोघेही वेळेत फिट होऊ शकले नाहीत, तर अंडर-19 विश्वचषकात वैभव सूर्यवंशीच भारतीय संघाचे नेतृत्व करेल, याबाबत कोणतीही शंका उरत नाही.

हे ही वाचा - 

Arjun Tendulkar Wedding Date : सचिन तेंडुलकरच्या लेकाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला! दोन दिवसात उरकणार हळद अन् सात फेरे, जाणून कधी?