India vs Pakistan, Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उत्साह आता मोठ्या सामन्यांसह शिगेला पोहोचत आहे. सुपर संडेला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवान म्हणाला की, त्याने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला आहे. संघाचा स्टार खेळाडू फखर जमानच्या दुखापतीमुळे इमाम उल हकला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.
भारतीय कर्णधार रोहितने प्लेइंग-11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. रोहित म्हणाला की, काही फरक पडत नाही, त्यांनी नाणेफेक जिंकली म्हणून आपण आधी गोलंदाजी करणार आहे, पण मी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणार होतो. खेळपट्टी गेल्या सामन्यासारखेच दिसत आहे. आमच्याकडे फलंदाजीत अनुभवी संघ आहे त्यामुळे खेळपट्ट्या मंदावल्यास काय करावे लागेल हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे संघात कोणता बदल केला नाही.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
पाकिस्तान संघ : इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक/कर्णधार), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एक प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेत उतरला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान आहे. पण, भारताविरुद्धचा त्यांचा सामना दुबईसारख्या तटस्थ ठिकाणी होईल. सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही आणि भारताचे सर्व सामने फक्त दुबईमध्येच होतील. रोहित शर्मा आणि कंपनीने दुबईमध्येही त्यांच्या मोहिमेची सुरुवात चांगली केली आहे, जिथे त्यांनी बांगलादेशला 6 गडी राखून पराभूत केले.
भारत-पाकिस्तान सामन्यांचा विचार केला तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचाच वरचष्मा असल्याचे दिसून येते. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत एकूण 135 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. या काळात भारताने फक्त 57 विजय मिळवले आहेत.
तटस्थ ठिकाणी कोणता संघ वरचढ?
भारत आणि पाकिस्तानने त्यांचे बहुतेक सामने तटस्थ ठिकाणी खेळले आहेत, जिथे पाकिस्तानने 40 सामने जिंकले आहेत तर टीम इंडियाने 34 सामने जिंकले आहेत. इथेही पाकिस्तानला थोडीशी आघाडी आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानचा विक्रम
आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण 5 सामने झाले आहेत, ज्यात पाकिस्तानने 3 सामन्यांमध्ये भारताला पराभूत केले आहे. तर, भारताला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला हरवून पाकिस्तानने विजेतेपद जिंकले होते.
दुबईच्या खेळपट्टीचा काय होणार परिणाम?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकूण 59 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 22 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दुबईची खेळपट्टी संथ मानली जाते. फिरकीपटूंना येथे मदत मिळते. येथे फलंदाजांना लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होऊ शकते. सुरुवातीला दुबईची खेळपट्टी गोलंदाजांना काही मदत करू शकते. अलिकडेच बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी 8 विकेट्स घेतल्या होत्या.
हे ही वाचा -
