Ind vs Eng Semi-Final Tickets : 2026 च्या टी-20 विश्वचषकातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वीच तिकीटांच्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विधानपरिषदेतही आमदारांनी संताप व्यक्त करत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर टीका केली.

Continues below advertisement

भारत-इंग्लंड उपांत्य सामना: तिकिटांवरून विधानपरिषदेत गदारोळ

सामन्यासाठी तिकीटांची मोठी मागणी असल्यामुळे अनेकांना पास किंवा तिकीट मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. आमदार सचिन अहिर यांनी परिषदेत हा मुद्दा उपस्थित करत, “भारत-इंग्लंड सामना मुंबईत होत आहे, याचा अभिमान आहे. मात्र पूर्वी शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष असताना अधिवेशनाच्या काळात सदस्यांना पास दिले जात. आता मोठ्या कंपन्यांचे लोक स्टेडियममध्ये बसतात, पण आमदारांना पास मिळत नाहीत,” अशी खंत व्यक्त केली.

Continues below advertisement

तसेच सनदी अधिकारी आणि पोलिसांना तिकीट मिळतात, पण आमदारांना पास मिळत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. काहींना ‘मस्का’ लावल्यावरच पास मिळतात, असा आरोपही त्यांनी केला.

काय म्हणाले आमदार?

उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सामना असताना आम्ही सदस्यांना तिकीट देतो. तसंच येथेही आमदारांसाठी पासची व्यवस्था व्हायला हवी. अधिवेशन सुरू असताना सदस्यांना सामना पाहण्यासाठी योग्य व्यवस्था असावी.”

सभापती राम शिंदे यांनीही या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत, “सचिन अहिर यांनी अतिशय केविलवाणी परिस्थिती मांडली आहे. क्रीडामंत्री बघ्याची भूमिका घेत आहेत. आमदारांसाठी पासेसची व्यवस्था करायला हवी,” असे मत व्यक्त केले.

दरम्यान, आमदार अनिल परब यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्हाला फुकट पास नकोत. आमच्याकडून पैसे घ्या, पण तिकीट तरी द्या. आम्हाला फुकट काहीही नको.”

यावर आमदार दत्तात्रय भरणे यांनीही लक्ष वेधत सांगितले की, क्रीडा विभागालाही पास दिले जात नाहीत. भविष्यात अधिवेशनाच्या काळात सामने असतील तर सदस्यांसाठी पास उपलब्ध करून देण्याची तरतूद केली जावी. दरम्यान, आज होणाऱ्या भारत-इंग्लंड उपांत्य सामन्यापूर्वीच तिकीटांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला हा वाद चर्चेचा विषय ठरत आहे. क्रिकेटचा उत्साह एका बाजूला असताना, दुसऱ्या बाजूला तिकीट वितरणाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हे ही वाचा -

IND vs ENG Semi Final LIVE Update 2026 : जो जिंकेल टॉस, तोच बनेल बॉस... वानखेड्यावर टॉसच ठरवणार भारत-इंग्लंड लढतीचा निकाल? जाणून घ्या Live अपडेट्स