India vs Australia Women's T20 World Cup Semifinal Scenario : महिला टी-20 विश्वचषक 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीची तिकिटे निश्चित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रुप बी मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने आधीच आपले स्थान पक्के केले आहे, परंतु ग्रुप ए मधून अजूनही कोणत्याही संघाला उपांत्य फेरीचे तिकीट मिळालेले नाही. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Continues below advertisement

सामना रद्द झाल्यास गुणतालिकेवर काय परिणाम होईल? (India vs Australia Women's T20 World Cup Semifinal Scenario)

Continues below advertisement

क्रिकेट चाहत्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की, जर या महत्त्वाच्या सामन्यात पावसाने खोडा घातला आणि सामना रद्द झाला, तर उपांत्य फेरीत कोण पोहोचणार? सध्याच्या गुणतालिकेचा विचार केला तर ऑस्ट्रेलियाचा संघ 4 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे. तर भारतीय संघ 4 सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे. जर आजचा सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण वाटून दिला जाईल. 1 गुण मिळाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे एकूण 9 गुण होतील आणि ते ग्रुप ए मधून अव्वल स्थानी राहून थेट उपांत्य फेरीत प्रवेश करतील. सामना रद्द झाल्यास भारताचे फक्त 7 गुण होतील. अशा परिस्थितीत भारताचे स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात येऊ शकते आणि टीम इंडियाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशवर अवलंबून असेल भारताचे भवितव्य

जर भारताचा सामना रद्द झाला आणि भारताचे 7 गुण झाले, तर सेमीफायनलचे गणित पूर्णपणे दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश या सामन्यावर अवलंबून असेल. दक्षिण आफ्रिकेचे सध्या 6 गुण आहेत आणि ते नेट रनरेटमुळे तिसऱ्या स्थानावर आहेत. जर त्यांनी बांगलादेशचा पराभव केला, तर त्यांचे 8 गुण होतील. अशा परिस्थितीत 8 गुणांसह दक्षिण आफ्रिका आणि 9 गुणांसह ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये पोहोचतील, तर भारताचे 7 गुण असल्यामुळे टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडेल.

जर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले, तर दक्षिण आफ्रिका 6 गुणांवरच रोखली जाईल. बांगलादेशने सामना जिंकला तरी ते भारताच्या 7 गुणांची बरोबरी करू शकणार नाहीत. या परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.

लॉर्ड्समधील हवामानाचा अंदाज

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सुरू होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सामन्याच्या वेळी लॉर्ड्सवर पावसाची कोणतीही शक्यता नाही. आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून चाहत्यांना आणि खेळाडूंना संपूर्ण 20-20 षटकांचा रोमांचक सामना पाहायला मिळेल.

भारतीय महिला संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यास्तिका भाटिया (यष्टिरक्षक), रिचा घोष (यष्टिरक्षक), जेमिमा रॉड्रिग्ज, भारती फुलमाळी, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, नंदिनी शर्मा, श्री चरणी आणि राधा यादव.

हे ही वाचा -

IND vs IRE 2nd T20 Playing XI : वैभव सूर्यवंशी IN, वॉशिंग्टन सुंदर OUT? दुसऱ्या टी-20 सामन्यात अशी असेल टीम इंडियाची खतरनाक प्लेइंग-11