IND vs AUS : तब्बल आठ महिन्यांनी भारतीय संघ आपला आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. आज सुरु असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने आपल्या एकदिवसीय सामन्यातील 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात जलद 5000 धावा पूर्ण करणारा तो दूसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.
भारतीय संघ तब्बल आठ महिन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. त्याआधी भारतीय संघाने लॉकडाऊनपूर्वी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च महिन्याच्या सुरुवातीला न्यूझिलंड विरोधात खेळला होता. कोरोना महामारीमुळे बरेच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिलेल्या भारतीय संघाचा सामना आता ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंशी होत आहे. अशातच यजमान संघाला पराभूत करणं भारतीय संघासाठी फारसं सोपं असणार नाही. तसेच भारतीय संघ आपल्या जुन्या अंदाजात म्हणजेच, 1992च्या विश्वचषकाच्या नेव्ही ब्ल्यू जर्सीमध्ये दिसत आहे.
भारतीय संघाला आपला 'हिटमॅन' रोहित शर्माची कमतरता जाणवणार आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या गैरहजेरीत फलंदाजांच्या क्रमवारीवर नक्कीच परिणाम होणार आहे. या मालिकेपासून स्टेडियममध्ये प्रेक्षकांची एन्ट्री होणार आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून उपलब्ध जागांच्या केवळ 50 टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
केएल राहुलसाठी हा दौरा एखाद्या अग्निपरिक्षेप्रमाणेच असणार आहे. उपकर्णधार केएल राहुलने आयपीएलमध्ये शानदार खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही आपली कामगिरी उत्तम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु, केएल राहुलची खरी कसोटी विकेटकिपर म्हणून असणार आहे. कारण त्याला विकेटच्या मागे धोनीची जागा घ्यावी लागणार आहे. स्वतः राहुलने मान्य केलं आहे की, धोनीची जागा घेणं कोणालाही शक्य नाही.
महत्वाच्या बातम्या:
- IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियातील पहिला वनडे सामना आज; स्टेडियमध्ये होणार प्रेक्षकांची एन्ट्री
- Phillip Hughes: आजच्याच दिवशी बाउंसरने घेतला होता फिलिप ह्यूजचा बळी, #63notout ट्रेंड!