IND U19 vs PAK U19 दुबई : आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वातील अंडर 19 टीम इंडिया येत्या रविवारी पाकिस्तानसोबत अंतिम सामन्यात लढणार आहे. भारतानं उपांत्य फेरीत श्रीलंकेला  8 विकेटनं पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली. दुसरीकडे पाकिस्ताननं देखील बांगलादेशला 8 विकेटनं पराभूत करत अंतिम फेरीतील स्थान पक्कं केलं. त्यामुळं आता भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत. 

Continues below advertisement

INDU19-PAKU19 : भारत पाकिस्तान आमने सामने

आशियाई क्रिकेट परिषदेनं अंडर 19 आशिया कप स्पर्धेचं आयोजन केलं आहे. अ गटातील साखळी सामन्यात आयुष म्हात्रेच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं पाकिस्तानच्या संघाला 90 धावांनी पराभूत केलं होतं. आता भारतापुढं अंतिम फेरीत पाकिस्तानचं आव्हान आहे. भारत आणि पाकिस्तान आता 21 डिसेंबरला दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर आमने सामने येतील. 

भारताचा उपांत्य फेरीत श्रीलंकेवर विजय

भारत आणि श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना 138  धावा 8 विकेट गमावून केल्या होत्या. या धावसंख्याचा पाठलाग करताना  भारताची सुरुवात खराब झाली होती. मात्र, विहान मल्होत्रा आणि अरॉन जॉर्ज या दोघांनी 114  धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.  या विजयामुळं भारतानं अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, श्रीलंकेला स्पर्धेबाहेर जावं लागलं.

Continues below advertisement

पाकिस्तानचा बांगालदेशवर विजय

पाकिस्तान आणि बांगलादेश  यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडला. बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 121  धावा केल्या होत्या. पाकिस्ताननं  16.3 ओव्हरमध्ये 2 विकेटवर  122 धावा करत 8 विकेटनं विजय मिळवला. या विजयासह पाकिस्ताननं अंतिम फेरीच्या लढतीत प्रवेश केला.

भारताचा संघ 

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अरोन जॉर्ज, विहान म्हलोत्रा,  वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल,  दीपेश देवेंद्रन, किशन कुमार सिंह

पाकिस्तानचा संघ

उस्मान खान, समीर मिन्हास, फरहान युसूफ, अहमद हुसैन, हुझाफिया अहसन, हाम्झा झहूर, डॅनियल अली खान, मोहम्मद शयन,  अब्दुल शुभन, मोहम्मद सय्यम,अली राझा

 अंडर 19 आशिया कपची फायनल कुठे पाहणार?

भारत आणि पाकिस्तानचे युवा संघ आता अंडर 19 आशिया कपसाठी आमने सामने येतील. भारतानं साखळी सामन्यात पाकिस्तानवर 90 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. अंडर 19 आशिया कपची फायनल तुम्ही सोनी लिव्ह आणि सोनी स्पोर्टस नेटवर्कच्या चॅनेलवर पाहू शकता. ज्यांच्याकडे सोनी लिव्हचं सबस्क्रीप्शन असेल त्यांना हा सामना पाहता येईल. आयुष म्हात्रेचा संघ आशिया कप जिंकणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.