India Playing XI vs Japan : जपानविरुद्ध होणाऱ्या एकमेव टी-20 सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर सर्वांची नजर असेल. अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत वैभवला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, जपानविरुद्ध त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी वैभव अजून खूपच तरुण असल्याचे सांगत संघातील अनुभवी खेळाडूंना प्राधान्य मिळणे स्वाभाविक असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचवेळी, वैभवला संधी मिळाल्यानंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेशा संधी दिल्या जातील, असेही गंभीर यांनी म्हटले होते.
वैभव-अभिषेकची सलामीची जोडी?
जपानविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करताना दिसू शकतात. 2026 च्या आशियाई खेळांपूर्वीचा हा भारताचा शेवटचा अधिकृत टी-20 सामना असल्याने संघ व्यवस्थापनाकडून काही राखीव खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत वैभवला बाहेर बसावे लागले होते. त्यामुळे जपानविरुद्ध त्याला संधी देऊन त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्षमता तपासण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असू शकतो. यानंतर इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर, कर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर, तर उपकर्णधार तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
मधल्या फळीत अष्टपैलूंची फौज
मधल्या फळीत शिवम दुबे, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यावर जबाबदारी असू शकते. फिरकी विभागात लेगस्पिनर रवी बिश्नोईला संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, एकदिवसीय संघात नितीश कुमार रेड्डीचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या दुखापतीमुळे यश ठाकूरचा संघात समावेश झाला आहे. मात्र, जपानविरुद्धच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग सांभाळू शकतात.
जपानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग-XI
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.
टी-20 सामन्यासाठी जपानचा संघ : केंडल फ्लेमिंग (कर्णधार), ॲलिस्टर फ्लेमिंग, कोहेई कुबोटा, डेक्लन सुझुकी, त्सुयोशी ताकाडा, माकोटो तानियामा, लाचलान यामामोटो-लेक, बेंजामिन इटो-डेव्हिस, जेक कुसुदा-नायर्न, र्यो साकुरानो-थॉमस, इब्राहिम ताकाहाशी, शोमा स्लेटर, वाटरू मियाउची, शिराय पाटमोर (यष्टीरक्षक), चार्ली हारा-हिंझ्यू.
भारत विरुद्ध जपान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक
- सामन्याची तारीख - 22 सप्टेंबर, मंगळवार
- भारत सामन्याची सुरुवात (IST) - सकाळी 9 : 30
- सामना कोठे खेळला जाईल - सानो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, तोचिगी प्रांत
हे ही वाचा -
