India Playing XI for 5th T20I vs New Zealand : टी-20 विश्वचषकाचा प्रबळ दावेदार असलेला भारत संघ शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. विश्वचषकापूर्वी हा भारताचा शेवटचा टी-20 सामना असून, यामध्ये संजू सॅमसन आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर फॉर्ममध्ये परतण्याची आणि अक्षर पटेल पूर्णपणे फिट होण्याची भारतीय संघाला आशा आहे.

Continues below advertisement

विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने प्रयोग करत फक्त पाच प्रमुख गोलंदाजांना संधी दिली होती. ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्याकडून गोलंदाजी करून घेतली नव्हती. हा सामना भारताने गमावला असला, तरी मालिकेच्या निकालावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही, कारण भारताने आधीच मालिका आपल्या नावावर केली होती.

वरुण चक्रवर्तीला पुन्हा संधी...

Continues below advertisement

मालिकेतील मागील सामन्यांप्रमाणेच भारत पुन्हा एकदा गोलंदाजी विभागात बदल करू शकतो. मागील दोन सामने विश्रांती दिल्यानंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाजी विभागात फारसे बदल अपेक्षित नाहीत, मात्र संघ व्यवस्थापनाचे लक्ष संजू सॅमसनकडे असेल. निर्भय फलंदाजीसाठी ओळखला जाणारा सॅमसन या मालिकेत धावा करण्यासाठी झगडताना दिसला आहे. फक्त फॉर्मच नाही, तर त्याच्या तांत्रिक कमतरता संघासाठी चिंतेचा विषय ठरत असून त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही डगमगलेला दिसतो. 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी मोठी खेळी करण्यासाठी तो उत्सुक असेल.

संजू सॅमसन OUT, फॉर्मात असलेल्या ईशान किशनचं पुनरागमन...

सॅमसनसाठी ईशान किशन हा मजबूत पर्याय भारताकडे उपलब्ध आहे. या मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली होती, मात्र अज्ञात दुखापतीमुळे तो मागील सामन्यात खेळू शकला नव्हता. ऑलराऊंडर अक्षर पटेल नागपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बोटाला दुखापत झाल्यापासून संघाबाहेर आहे. विशाखापट्टणममधील चौथ्या सामन्यापूर्वी त्याने नेटमध्ये गोलंदाजी केली होती.

भारत 7 फेब्रुवारीला मुंबईत विश्वचषकातील पहिला सामना खेळणार असून, त्याआधी विजय मिळवून आत्मविश्वास वाढवण्याचा संघाचा प्रयत्न असेल. त्यामुळे हा सामना भारतासाठी केवळ औपचारिकता ठरणार नाही. न्यूझीलंडविरुद्ध 4-1 अशी दणदणीत मालिका जिंकली, तर भारताचा आत्मविश्वास आणखी उंचावेल. मात्र न्यूझीलंड संघाला ते अजिबात मंजूर नसेल.

मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत भारताच्या आक्रमक खेळापुढे न्यूझीलंड हतबल दिसला होता. मात्र विशाखापट्टणममध्ये त्यांनी भारताच्या प्रमुख फलंदाजांना रोखण्यात यश मिळवले. अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केल्यानंतर, शिवम दुबेच्या तुफानी फलंदाजीनंतरही इतर फलंदाजांना रोखण्यात न्यूझीलंड यशस्वी ठरला.  

भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, इशान किशन (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई.

India Playing XI for 5th T20I vs New Zealand : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई.