India best playing 11 for T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या तोंडावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 अशी जिंकत आपल्या तयारीवर शिक्कामोर्तब केले. या विजयामुळे भारतीय संघ मोठ्या आत्मविश्वासाने आयसीसीच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत उतरणार आहे. या मालिकेदरम्यान भारताने वर्ल्ड कपसाठी संभाव्य असलेल्या जवळपास सर्व खेळाडूंना संधी दिली. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला मोलाची मॅच प्रॅक्टिस मिळाली. मात्र या मालिकेत तिलक वर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून, टी20 वर्ल्ड कपसाठी त्याला फिट घोषित करण्यात आले आहे.
तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा निश्चित
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात तिलक वर्माची एन्ट्री जवळपास निश्चित मानली जात आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. ओपनिंगबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे. अभिषेक शर्मा ओपनिंग करणार हे ठरलेले असले, तरी त्याच्यासोबत संजू सॅमसन की ईशान किशन यावर चर्चा सुरू आहे.
ईशान की संजू? संघ व्यवस्थापनाचा मोठा निर्णय
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ईशान किशनने दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. मात्र संजू सॅमसनची कामगिरी निराशाजनक ठरली. तरीही वर्ल्ड कपमधील सुरुवातीचे सामने तुलनेने कमकुवत संघांविरुद्ध असल्याने संजुला संधी देऊन त्याला फॉर्ममध्ये येण्याची संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे, इशानची फलंदाजी प्रभावी असली तरी विकेटकीपिंगमध्ये संजू अधिक भरोसेमंद मानला जातो.
फिरकीत कुलदीपऐवजी वरुण?
टी-20 वर्ल्ड कपसाठी भारताची संभाव्य सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन पाहता सूर्यकुमार यादव चौथ्या, हार्दिक पांड्या पाचव्या, तर रिंकू सिंह सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. अक्षर पटेल फिट असून तो संघाचा उपकर्णधार असल्याने त्याचे स्थान निश्चित आहे. फिरकी गोलंदाजीमध्ये कुलदीप यादवपेक्षा वरुण चक्रवर्तीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळतील.
टी20 वर्ल्ड कप 2026 साठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (India Playing 11 for T20 World Cup 2026) -
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन / इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
हे ही वाचा -
