Team India, Dinesh Karthik, IND vs SA T20 Series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 9 जून रोजी पाच सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताने 16 वर्षापूर्वी एक डिसेंबर 2006 मध्ये पहिला टी 20 सामना खेलला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघाने 159 टी 20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, पहिला टी 20 सामना खेळणारा कार्तिक आताही भारतीय संघाचा सदस्य आहे. इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.  


कार्तिक वगळता सर्व खेळाडू निवृत्त -
एक डिसेंबर 2006 रोजी भारताने दक्षिण आफ्रिकाविरोधात आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळला होता. तेव्हा वीरेंद्र सेहवाग भारताचा कर्णधार होता. त्यावेळी भारतीय संघात सचिन तेंदुलकर, दिनेश मोंगिया, महेंद्र सिंह धोनी, सुरेश रैना, इरफान पठान, हरभजन सिंह, झहीर खान, एस श्रीसंत, अजीत अगरकर आणि दिनेश कार्तिक खेळले होते. कार्तिक वगळता सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.   


भारताच्या पहिल्या टी 20 सामन्यात कार्तिकची मॅच विनिंग खेळी 
16 वर्षापूर्वी भारताच्या पहिल्या टी 20 सामन्यात दिनेश कार्तिकने मॅच विनिंग खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 126 धावा केल्या होत्या. भारताकडून मोक्याच्या क्षणी दिनेश कार्तिकने 31 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती.  या सामन्यात वीरेंद्र  सहवाग 34 आणि मोंगियाने 38 धावा केल्या होत्या. तर धोनी शून्य, सचिन 10 आणि रैना तीन धावांवर नाबाद होता.  


कार्तिकला संधी कमी - 
भारताला पहिला टी 20 सामना जिंकून देणाऱ्या कार्तिकला आतंरराष्ट्रीय टी 20 सामन्यात म्हणावी तशी संधी मिळाली नाही.  भारताने आतापर्यंत 150 पेक्षा जास्त टी 20 सामने खेळले आहेत. पण पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणाऱ्या कार्तिकला फक्त 31 सामन्यात संधी मिळाली आहे. दिनेश कार्तिकने भारताकडून अखेरचा टी 20 सामना 2019 मध्ये खेळला होता.  


निदहास चषकात अखेरच्या चेंडूवर षटकार - 


बांग्लादेशविरोधात दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला निदाहास चषक जिंकून दिला होता. त्यानंतर कार्तिकला संधी मिळाली नाही. आश्चर्यकारक बाब म्हणजे, दिनेश कार्तिकला टी 20 सामन्यात अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. टी 20 मध्ये कार्तिकच्या नावावर 399 धावा आहेत.  


आयपीएल 2022 मध्ये दमदार कामगिरी - 
भारतीय संघातून बाहेर असलेल्या कार्तिकने 2022 आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केले. आयपीएलमधील विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर कार्तिकने पुन्हा एकदा भारतीय संघाचं दरवाजे उघडले आहेत. आयपीएल 2022 मध्ये कार्तिकने 184 च्या स्ट्राईक रेटने 330 धावांचा पाऊस पाडलाय.