मुंबई : श्रीलंकेने (Sri Lanka) विजयासह आशिया कप 2023 (Asia Cup 2023) च्या सुपर-4 फेरीत एन्ट्री मारली आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तान (Afghanistan) विरोधातील आशिया चषकातील शेवटचा साखळी सामना दोन धावांनी जिंकून सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडिअमवर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना श्रीलंकेने 50 षटकांत 8 विकेट गमावत 291 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 37.4 षटकांत 289 धावांवर सर्वबाद झाला.


श्रीलंका सुपर-4 मध्ये दाखल


अफगाणिस्तान आणि श्रीलंका (AFG vs SL) यांच्यातील आशिया चषक 2023 चा सहावा सामना लाहोर येथे खेळला गेला ज्यात अफगाण संघाचा 2 धावांनी पराभव झाला आणि यासह अफगाणिस्तान संघ सुपर 4 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता 12 सप्टेंबरला श्रीलंकेचा सामना भारताशी होणार आहे.


श्रीलंकेचा वनडेमधला सलग बारावा विजय 


श्रीलंकेने सलग 12व्यांदा प्रतिस्पर्ध्याला ऑलआऊट केलं असून, हा विश्वविक्रम आहे. श्रीलंकेचा वनडेमधला सलग बारावा विजय मिळवला आहे. श्रीलंका संघाचा शेवटचा पराभव देखील याच वर्षी जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध झाला होता. मात्र, श्रीलंकेने हा पराभवाचा वचपा काढत आता थेट आशिया कपच्या सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. 


ब गटातून श्रीलंका आणि बांगलादेशने सुपर-4 फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. श्रीलंकेच्या विजयासह आशिया कप 2023 मधील नेपाळ आणि अफगाणिस्तानचा प्रवास संपला आहे. आशिया चषक स्पर्धेत 6 सप्टेंबरपासून सुपर-4 फेरी होणार आहे. तर या आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.




'या' संघांचं सुपर-4 फेरीत स्थान पक्कं


भारत आणि पाकिस्तानचे संघ अ गटातून सुपर-4 फेरीत पोहोचले आहेत. भारत आणि पाकिस्तानकडे प्रत्येकी 3-3 गुण आहेत. नेपाळचा संघ अ गटातून बाहेर पडला. तर, ब गटातून श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ सुपर-4 फेरीत पोहोचले आहेत. अफगाणिस्तानला सुपर-4 फेरी गाठण्यात अपयश आलं. श्रीलंकेचा संघ 4 गुणांसह सुपर-4 फेरीत पोहोचला. श्रीलंकेने बांगलादेश आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. बांगलादेश संघाने 2 गुणांसह सुपर-4 फेरी गाठली. शकिब अल हसनच्या संघाला श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तर बांगलादेशने अफगाणिस्तानचा पराभव केला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Asia Cup 2023 : आशिया चषकाच्या वेळापत्रकात बदल, सुपर 4 च्या सामन्याचे ठिकाण बदलले