Morne Morkel IND vs ENG T20 World Cup Semi Final 2026 : टी-20 विश्वचषक स्पर्धेचा गतविजेता असलेला भारत सुरुवातीला प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र आतापर्यंतचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला. वेस्ट इंडिजविरुद्ध ‘करो किंवा मरो’ परिस्थितीत टीम इंडियाने कसाबसा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. आता उपांत्य फेरीत भारतासमोर आता इंग्लंडचं मोठं आव्हान उभं आहे. या मोठ्या लढतीपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, आता फक्त जिंकण्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे, कारण या टप्प्यावर फक्त निकालालाच अर्थ असतो.
इंग्लंडला रोखणं सोपं नाही...
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मॉर्केल म्हणाले, “इंग्लंड उत्तम संघ आहे. ते आक्रमक क्रिकेट खेळतात. आपण त्यांना 120-150 धावांत गुंडाळू, अशी अपेक्षा ठेवणं वास्तववादी नाही. आपण उपांत्य फेरीत आहोत, कारण आतापर्यंत जिंकत आलो आहोत. भारतात विजय-पराजयातील फरक फारच कमी असतो.”
ते पुढे म्हणाले, “उपांत्य फेरीपर्यंत कसे पोहोचलो, हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे पुढील दोन सामन्यांत आपण कसं खेळतो.”
जिंकण्याची कोणतीच हमी नाही, पण संधी नक्की असते....
मॉर्केल यांनी परफेक्ट मॅच या संकल्पनेवर भर न देता संघाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. “आमच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. गरज पडली तर कोणताही खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करू शकतो. शेवटच्या दोन सामन्यांतही चांगली कामगिरी होईल, अशी अपेक्षा आहे. क्रिकेटमध्ये जिंकण्याची कोणतीही हमी नसते. पण मैदानात उतरून सर्वोत्तम देण्याची संधी नक्की असते, आणि आम्ही त्यासाठी सज्ज आहोत,” असे ते म्हणाले.
इंग्लंडची ताकद लक्षात घेणं गरजेचं
मॉर्केल यांनी इंग्लंडला अत्यंत धोकादायक संघ ठरवत त्यांच्या फलंदाजीची खोली आणि गोलंदाजीतील विविधता अधोरेखित केली. “त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. फलंदाजीमध्ये खोली आहे, तर गोलंदाजीत विविध पर्याय आहेत. हीच त्यांची खरी ताकद आहे,” असे त्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी इंग्लंडवर मिळवलेला विजय आता अप्रासंगिक असल्याचं सांगत मॉर्केल म्हणाले की, “प्रत्येक सामना वेगळा असतो. गुरुवारी दोन आक्रमक संघांमध्ये रंगतदार लढत होईल.”
हे ही वाचा -
