IND U19 vs SA U19 नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेत भारतानं वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्त्वात दक्षिण आफ्रिकेला 3-0 नं पराभूत केलं आहे. भारतानं तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेवर 233 धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या वनडेत भारतानं प्रथम फलंदाजी करत 393 धावा केल्या होत्या. भारतासाठी वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज या दोघांनी शतकं केली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 160 धावांवर गारद झाला.
दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि आरोन जॉर्ज या दोघांनी 227 धावांची भागीदारी केली. वैभव सूर्यवंशीनं 63 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशीलचं लिस्ट ए करिअरमधील दुसरं शतक ठरलं. या डावात त्यानं 74 बॉलवर 127 धावा केल्या. यामध्ये त्यानं 9 चौकार आणि 10 षटकार मारले. याशिवाय आरोन जॉर्ज यानं 106 बॉलमध्ये 118 धावा केल्या. सूर्यवंशी आणि जॉर्ज या दोघांनी 227 धावांची भागीदारी केली. भारताची पहिली विकेट 25.4 ओव्हरमध्ये गेली. त्यानंतर भारतानं 148 बॉलमध्ये 166 धावा केल्या. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 393 धावा केल्या.
भारतासाठी सर्वाधिक विकेट किशन कुमार सिंह यानं घेतल्या. ज्यानं 4 ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. यानंतर मोहम्मद एनान यानं 2 विकेट, वैभव सूर्यवंशीनं 2 ओव्हर गोलंदाजी करत 10 धावा देत एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेचा सुपडा साफ
भारताच्या अंडर-19 टीमनं ही मालिका 3-0 अशी जिंकली. भारतानं पहिल्या वनडेत डकवर्थ लुईस मेथडनं 25 धावांनी जिंकली. दुसऱ्या वनडेत भारतानं 246 धावांचं आव्हान 24 ओव्हरमध्ये पार केलं. तर, तिसऱ्या वनडेत 233 धावांनी विजय मिळवला.
आता पुढची मोहीम वर्ल्ड कप
भारतानं दक्षिण आफ्रिकेला तीन वनडेत पराभूत केल्यानंतर पुढची मोहीम अंडर 19 वर्ल्ड कप आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं नेतृत्त्व वैभव सूर्यवंशी यानं केलं. मात्र, वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्त्व आयुष म्हात्रे करणार आहे. दुखापतीमुळं तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला नव्हता. आता अंडर 19 वनडे वर्ल्ड कप 15 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेत सुरु होणार आहे.
