India beat USA T20 World Cup 2026 : आयसीसी टी-20 विश्वचषकाचा बिगुल आज वाजला आणि पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारताने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ निर्धारित षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारू शकला. यासह भारताने या स्पर्धेतील आपले पहिले दोन गुण खात्यात जमा केले.

Continues below advertisement

टॉप ऑर्डर पूर्णपणे ढेपाळली

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 161 धावा केल्या. मात्र, टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब ठरली. सलामीवीर अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर आऊट झाला.  यानंतर ईशान किशन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी काही आकर्षक फटकेही मारले, पण पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात शॅडली वान शल्कविकने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ईशान किशन (20 धावा) बाद झाला. पुढच्या दोन चेंडूवर तिलक वर्मा (25) आणि शिवम दुबे (0) यांनाही माघारी पाठवले. शिवम दुबे बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 46/4 अशी होती.

Continues below advertisement

सूर्यकुमारचं वादळी अर्धशतक... 

यानंतर रिंकू सिंग आणि हार्दिक पांड्यांकडूनही अपेक्षित कामगिरी झाली नाही. रिंकू सिंग 6 धावांवर मोहम्मद मोहसिनचा बळी ठरला, तर हार्दिक पंड्याला हरमीत सिंगने बाद केलं. हार्दिक आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर 77/6 असा झाला होता. येथून अक्षर पटेल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी सातव्या विकेटसाठी 41 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अक्षर पटेल 14 धावा करून हरमीत सिंगचा बळी ठरला. अक्षर बाद झाल्यानंतर काही वेळातच सूर्यकुमार यादवने आपली अर्धशतकी खेळी पूर्ण केली.  सूर्यकुमार यादव एकाकी झुंज देत क्रीजवर ठाम उभा राहिला. मात्र दुसऱ्या टोकाला अर्शदीप सिंग (4) आणि वरुण चक्रवर्ती (0) यांची विकेट्स पडत राहिल्या. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूमध्ये नाबाद 84 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार लगावले. अमेरिकेकडून शॅडली वान शल्कविकने उत्कृष्ट गोलंदाजी करत 25 धावांत 4 विकेट्स घेतल्या, तर हरमीत सिंगला 2 विकेट्स मिळाल्या.

अमेरिकेचा डाव 132 धावांवर आटोपला...

लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकन संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्येच यूएसएने तीन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. येथून मिलिंद कुमार आणि संजय कृष्णमूर्ती यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केला. मिलिंद कुमारने 100 स्ट्राईक रेटने 34 धावा केल्या, ज्यात 3 चौकार आणि 1 षटकार यांचा समावेश होता. मात्र, वरुण चक्रवर्तीने मिलिंदचा अडथळा संपवला. यानंतर मैदानावर फिरकीपटू अक्षर पटेलचा जादू पाहायला मिळाला. अक्षरने सलग चेंडूवर संजय कृष्णमूर्ती आणि हरमीत सिंग यांना बाद करत अमेरिकन डावाची कणा मोडली. संजयने 2 चौकार आणि 1 षटकारासह 31 चेंडूत 37 धावा केल्या, तर हरमीत सिंगला खातेही उघडता आलं नाही. अखेरीस अमेरिकन संघ भारतीय गोलंदाजीपुढे टिकू शकला नाही आणि डाव 132 धावांवर आटोपला.

हे ही वाचा -

IND vs USA : सूर्यानं वाचवली टीम इंडियाची अब्रू! लिंबू लिंबू संघासमोर खतरनाक टीम इंडियाची टॉप ऑर्डर ढेपाळली; अभिषेक, दुबे तर....