India Beat South Africa by 101 Runs 1st T20 : भारताने पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला तब्बल 101 धावांनी धुळ चारली. या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 100 विकेट्स पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरी बजावली. कटकमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 175 धावा केल्या, तर प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम केवळ 74 धावांवर गारद झाली. यापूर्वी कटकच्या बाराबती स्टेडियमवर भारत कधीच दक्षिण आफ्रिकेला हरवू शकला नव्हता. येथे झालेल्या दोन्ही सामन्यांत आफ्रिकेनेच भारताला पराभव दिला होता. मात्र, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा दुष्काळ संपवत आफ्रिकेला 101 धावांच्या पराभवाचा चटका दिला.
टीम इंडियाची सुरुवात फारच निराशाजनक....
पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची सुरुवात फारच निराशाजनक झाली. पॉवर-प्लेमध्ये भारताने अवघ्या 40 धावांत दोन महत्त्वाचे विकेट गमावले. शुभमन गिल फक्त 4 धावांवर, तर कर्णधार सूर्यकुमार यादव 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा देखील 17 धावां करू शकला. तिलक वर्मा याने 32 चेंडूत 26 धावांची खेळी केली, तर अक्षर पटेल 23 धावा करून पॅव्हेलियनला परतला. शिवम दुबे 9 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. भारतीय संघाकडून फक्त हार्दिक पांड्यानेच दमदार अर्धशतक झळकावले आणि त्याच्या जोरदार खेळीमुळे भारताने 20 षटकांत 175/6 धावा उभ्या केल्या.
हार्दिक पांड्याची तुफानी खेळी
लडखडलेल्या भारतीय डावाला आधार देण्याचे मोठे काम हार्दिक पांड्याने केले. अखेरपर्यंत टिकून राहणाऱ्या हार्दिकने दक्षिण आफ्रिकी गोलंदाजांना चांगलंच धारेवर धरलं. तुफानी फटकेबाजी करत 28 चेंडूत नाबाद 59 धावा ठोकल्या. या खेळी दरम्यान त्याने बॅटमधून 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याचा स्ट्राइकरेट तब्बल 210.71 इतका होता. याचदरम्यान हार्दिक पांड्याने टी-20 क्रिकेटमधील 100 षटकारांचा टप्पाही गाठला आणि भारताला सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचवले.
अर्शदीप सिंगचा कहर, जसप्रीत बुमराहचं ऐतिहासिक शतक!
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पावरप्लेअखेर त्याच्या तीन विकेट्स पडल्या होत्या. त्यानंतरही आफ्रिकन फलंदाज नियमित अंतराने माघारी परतत गेले आणि एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्याच्या खराब फलंदाजीची झलक म्हणजे संपूर्ण संघातून केवळ चारच फलंदाज दहाच्या पुढे जाऊ शकले. दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक 22 धावा केल्या. तर कर्णधार एडेन मार्करम आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी 14, तसेच मार्को यान्सेनने 12 धावा योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली. विशेष म्हणजे भारताच्या सर्वच गोलंदाजांनी विकेट घेतली, ही सामन्याची खास बाब ठरली. याचदरम्यान जसप्रीत बुमराहने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करत ऐतिहासिक टप्पा गाठला. तो हा पराक्रम करणारा अर्शदीपनंतर भारताचा दुसरा गोलंदाज ठरला.
हे ही वाचा -