Team India Beat Pakistan T20 World Cup Point Table 2026 : महाशिवरात्रीचा मुहूर्त आणि समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान... अशा हायव्होल्टेज वातावरणात टीम इंडियाने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या थरारात सूर्यकुमार यादवच्या यंग ब्रिगेडने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासोबतच भारताने दिमाखात सुपर-8 मध्ये धडक मारली असून पाकिस्तानच्या विश्वचषकातील आशा आता अधांतरी आहेत.
ईशान किशनचा तांडवा
प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजीची पिसे काढली. ईशानने 40 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांसह 77 धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत तीन चौकारांसह 32 धावा केल्या. यामुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 175 धावांचा आव्हानात्मक डोंगर उभा केला.
पाकिस्तानचा फ्लॉप शो
176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर एकाही पाकिस्तानी फलंदाजाला तग धरता आला नाही. संपूर्ण संघ 18 षटकांत अवघ्या 114 धावांत गारद झाला. 61 धावांच्या या मोठ्या विजयाने भारताच्या नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा झाली आहे.
सूर्यकुमार यादवचे कॅप्टन कूल नेतृत्व
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा आपली छाप पाडली. दबावाच्या क्षणी त्याने घेतलेले निर्णय गेमचेंजर ठरले. सलग तीन सामने जिंकून 6 गुणांसह भारताने अधिकृतपणे सुपर-8 चे तिकीट निश्चित केले आहे. भारताने गट फेरीत अव्वल स्थान गाठले असले तरी, या पराभवामुळे पाकिस्तानच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे.
गुणतालिका अन् सुपर-8 ची समीकरणे
टीम इंडियाने 3 सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण मिळवून अधिकृतपणे सुपर-8 मध्ये प्रवेश केला. या पराभवामुळे पाकिस्तानवर स्पर्धेबाहेर जाण्याची भीती वाढली आहे. पाकिस्तानचा पुढचा आणि शेवटचा सामना 18 फेब्रुवारीला नामबियाविरुद्ध होणार आहे. हा सामना त्यांना केवळ जिंकावाच लागणार नाही, तर इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे.
हे ही वाचा -
