India Beat New Zealand By 7 Wickets : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2–0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
धमाकेदार सुरुवात, पण मोठी भागीदारी जमली नाही...
न्यूझीलंडकडून टिम सीफर्ट आणि डेव्हन कॉनवे यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली, मात्र ही जोडी मोठी भागीदारी उभारू शकली नाही. संघाचा स्कोअर 43 धावांवर असताना डेव्हन कॉनवे बाद झाला. हर्षित राणाने त्याला माघारी धाडले. कॉनवेने अवघ्या 9 चेंडूमध्ये 19 धावा केल्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये वरुण चक्रवर्तीने टिम सीफर्टला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सीफर्टने 13 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी केली.
मिचेल सँटनरची झुंजार खेळी
यानंतर ग्लेन फिलिप्स विशेष प्रभाव टाकू शकला नाही. तो 13 चेंडूमध्ये 19 धावा करून आऊट झाला. त्यानंतर डॅरिल मिचेलही फार काळ टिकू शकला नाही. त्याने 11 चेंडूमध्ये 18 धावा केल्या. पुढे रचिन रवींद्रलाही कुलदीप यादवने तंबूत पाठवले. रचिनने 26 चेंडूमध्ये 44 धावांची चांगली खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मिचेल सँटनर आणि Zakary Foulkes यांनी 47 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत न्यूझीलंडचा स्कोअर 208 धावांपर्यंत नेला. सँटनरने 27 चेंडूमध्ये 47 धावांची आक्रमक खेळी केली.
धावांचा पाठलाग करताना भारताची संथ सुरुवात
208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. संजू सॅमसन 6 धावांवर मॅट हेन्रीचा बळी ठरला. त्यानंतर अभिषेक शर्माही पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जेकब डफीने त्याला बाद केले. अवघ्या 6 धावांत भारताचे दोन विकेट पडले.
सूर्यकुमार–ईशानची वादळी भागीदारी
त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 122 धावांची वादळी भागीदारी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. या भागीदारीदरम्यान ईशान किशनने 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने अवघ्या 21 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही आक्रमक फटकेबाजी करत अर्धशतक ठोकले. अखेर ईशान किशन 76 धावा करून बाद झाला. त्याने 32 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 4 षटकारांची जबरदस्त खेळी केली. पण शेवट सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
ईशान किशनने ठोकले ‘रेकॉर्डब्रेक’ अर्धशतक
जेव्हा ईशानने फक्त 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तेव्हा तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी चेंडूत अर्धशतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला. यापूर्वी, हा विक्रम भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माच्या नावावर होता, ज्याने मालिकेच्या पहिल्या सामन्यात 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. पण, ईशानने केवळ 48 तासांत अभिषेकचा विक्रम मागे टाकत एक नवीन इतिहास रचला.
हे ही वाचा -
