India Beat New Zealand 5th T20 : टी-20 वर्ल्डकपच्या रणधुमाळीपूर्वी भारतीय संघाने आपली तयारी पूर्ण केल्याचे संकेत दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने 4-1 असा विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व गाजवले. तिरुअनंतपुरम येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा 46 धावांनी धुव्वा उडवला.
वर्ल्डकपपूर्वी ईशान किशनने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याला कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांची मोलाची साथ लाभली. या तिघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने अवघ्या 5 विकेट्स गमावत 271 धावांचा भल्यामोठा डोंगर उभारला. इतक्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 225 धावांतच आटोपला. या मालिकेतील विजयासह टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकपपूर्वी आपला अभ्यास पूर्ण केला असून संघाचा आत्मविश्वास शिखरावर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.
अभिषेक शर्माची झंझावाती खेळी, संजू सॅमसन पुन्हा अपयशी
टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सलामीला मैदानात प्रवेश केला. मात्र या मालिकेत संजू सॅमसनची फलंदाजी पुन्हा एकदा अपयशी ठरली. संजू अवघ्या 6 चेंडूमध्ये 6 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडच्या लॉकी फर्ग्युसनने त्याला माघारी पाठवले. यानंतर अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने 16 चेंडूमध्ये 30 धावा केल्या. या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मात्र अभिषेकलाही लॉकी फर्ग्युसननेच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
सूर्यकुमार–ईशानची शतकी भागीदारी
तिसऱ्या विकेटसाठी ईशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात 137 धावांची जबरदस्त भागीदारी झाली. या दरम्यान दोघांनी चौकारांपेक्षा अधिक षटकार ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक झळकावत 30 चेंडूमध्ये 63 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 6 षटकार मारले. अखेर मिचेल सँटनरने सूर्यकुमारला बाद केले.
ईशान किशनचे पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक
ईशान किशनने या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. अवघ्या 42 चेंडूमध्ये त्याने शतक पूर्ण केले. पुढे तो 43 चेंडूमध्ये 103 धावांची तुफानी खेळी करून बाद झाला. या खेळीत ईशानने 6 चौकार आणि तब्बल 10 षटकार लगावले. शेवटी हार्दिक पांड्याने 17 चेंडूंमध्ये 47 धावांची स्फोटक खेळी केली. रिंकू सिंग 8 धावा आणि शिवम दुबे 7 धावांवर नाबाद राहिले. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडचा डाव 225 धावांवर आटोपला
सलामीवीर टिम सेफर्ट स्वस्तात बाद झाला. सेफर्टला अवघ्या 5 धावांवर अर्शदीप सिंगने माघारी धाडले. त्यानंतर फिन अॅलनने आक्रमक फलंदाजी करत न्यूझीलंडला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. अॅलनने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने केवळ 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. अॅलन शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता, मात्र अक्षर पटेलने त्याची झंझावाती खेळी थांबवली. अॅलनने 6 षटकार आणि 8 चौकारांसह 30 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर कोणी मोठी कामगिरी केली नाही आणि संपूर्ण न्यूझीलंडचा संघ 225 धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने 46 धावांनी हा सामना जिंकून मालिकेचा शेवट दिमाखात केला.
हे ही वाचा -
