India A Vs Bangladesh A Women's Asia Cup Rising Stars Final : महिला आशिया कप रायझिंग स्टार 2025 स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय अ संघ आणि बांगलादेशचा अ संघ यांच्यात बँकॉक येथील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात भारतीय अ संघाने 46 धावांनी दणदणीत विजय मिळवत दुसऱ्यांदा आशिया कप रायझिंग स्टार्सचा किताब पटकावला. यापूर्वी 2023 मध्येही त्यांनी बांगलादेशचा पराभव करून ही ट्रॉफी जिंकली होती.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय अ संघाने बांगलादेशसमोर 135 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर बांग्लादेशचा अ संघ फक्त संघ 19.1 षटकांत अवघ्या 88 धावांवर गारद झाला आणि भारताने सहज विजय संपादन केला.
तेजल हसबनीसचे अर्धशतक
भारतीय अ संघाकडून डावाची सुरुवात वृंदा दिनेश आणि नंदिनी कश्यप यांनी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी रचली. मात्र त्यानंतर भारताने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. आघाडीच्या फलंदाजांना सुरुवात चांगली मिळाली, पण ती मोठ्या खेळीत रूपांतरित करण्यात त्यांना अपयश आले.
या सामन्यात भारताकडून एकमेव अर्धशतक तेजल हसबनीस हिच्या बॅटमधून आले. तिने 34 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 51 धावांची दमदार खेळी साकारली. कर्णधार राधा यादव हिनेही 30 चेंडूत 36 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. वृंदा दिनेश हिने 17 चेंडूत 19 धावा करत संघाला हातभार लावला.
बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली
135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. अवघ्या 12 धावांवर पहिली विकेट पडली, जेव्हा इश्मा तंजीम 5 चेंडूत 3 धावा करून बाद झाली. त्यानंतर कोणतीही फलंदाज मोठी खेळी करू शकली नाही. संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही, तर केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. बांगलादेशकडून शमीमा सुल्ताना हिने 16 चेंडूत 20 धावा केल्या, तर सरमिन सुल्ताना हिने 29 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. भारताकडून गोलंदाजीत प्रेरणा रावत हिने सर्वाधिक प्रभाव टाकत 12 धावांत 3 विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
हे ही वाचा -
