India vs England U19 World Cup Final : 2026 च्या अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने अफलातून कामगिरी करत इतिहास रचला आहे. वैभव सूर्यवंशीच्या ताबडतोब 175 धावांच्या जोरावर भारताने फायनलमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोअर उभारला. भारताने 50 षटकांत 9 विकेट्स गमावत 411 धावा केल्या असून, आता इंग्लंडसमोर विजयासाठी तब्बल 412 धावांचे आव्हान ठेवले.
या निर्णायक सामन्यात वैभव सूर्यवंशी एकटाच इंग्लंडच्या गोलंदाजांवर भारी पडला. अवघ्या 55 चेंडूमध्ये शतक झळकावत त्याने 80 चेंडूमध्ये 175 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या धडाकेबाज इनिंगमध्ये वैभवने 15 षटकार आणि 15 चौकार ठोकले. विशेष म्हणजे, त्याने केलेल्या 175 धावांपैकी तब्बल 150 धावा फक्त षटकार आणि चौकार मारून आल्या.
वैभव सूर्यवंशीचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड
फक्त 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी अंडर-19 वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला आहे. यासोबतच, संपूर्ण अंडर-19 वर्ल्ड कप इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतकही आता त्याच्याच नावावर आहे. अंडर-19 वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या विल मालाजुककडे असला, तरी फायनलमधील सर्वात वेगवान शतकाचा वर्ल्ड रेकॉर्ड आता वैभव सूर्यवंशीचाच आहे.
इतकंच नाही, तर वैभव हा अंडर-19 वर्ल्ड कप फायनलमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी उन्मुक्त चंद (2012) आणि मनजोत कलरा (2018) यांनी हा पराक्रम केला होता.
वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाचा विक्रमी स्कोअर
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताची पहिली विकेट 20 धावांवर पडली. आरोन जॉर्जने 11 चेंडूमध्ये 2 चौकारांसह 9 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांच्यात 142 धावांची दमदार भागीदारी झाली. म्हात्रेने 51 चेंडूमध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. यानंतर वेदांत त्रिवेदी (36 चेंडूत 32 धावा), विहान मल्होत्रा (36 चेंडूत 30 धावा) आणि विकेटकीपर अभिज्ञान कुंडू (31 चेंडूत 40 धावा) यांनी उपयुक्त योगदान दिलं. कनिष्क चौहानने शेवटच्या षटकांत फटकेबाजी करत 20 चेंडूमध्ये नाबाद 37 धावा केल्या. यात 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता.
इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई....
इंग्लंडकडून सेबेस्टियन मॉर्गनने 9 षटकांत 74 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. अॅलेक्स ग्रीनने 5 षटकांत 49 धावा देत 2 फलंदाजांना बाद केलं, तर जेम्स मिंटोने 8 षटकांत 63 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या. मॅनी लुम्सडेनलाही एक विकेट घेण्यात यश आलं.
हे ही वाचा -
