Asian Games 2023 India vs Sri lanka Final Cricket Match : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 116 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी शानदार खेळी केली. श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचे आव्हान आहे. सुवर्णपदक पटकावण्यासाठी भारतीय गोलंदाजांना 117 धावांचा बचाव करायचा आहे.


भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी वेगवान सुरुवात केली. पण नऊ धावांवर शेफाली वर्मा तंबूत परतली. पण त्यानंतर स्मृतीने जेमिमासोबत भारताचा डाव सावरला. दोघांनी ८० धावांची भागिदारी केली. ही जोडी खेळत होती, तोपर्यंत भारत १५० धावसंख्येपर्यंत पोहचेल असेच वाटत होते. पण स्मृती बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. 


स्मृती मंधाना हिने ४५ चेंडूमध्ये ४६ धावांची खेळी केली. यामध्ये चार चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. तर जेमिमाने ४० चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये पाच चौकारांचा समावेश आहे. ही जोडी फुटल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. सुवर्णपदकाच्या सामन्यात श्रीलंका संघाने जोरदार कमबॅक केले. रिचा घोष ९, हरमनप्रीत कौर २ पूजा २ अमनज्योत कौर एक यांना मोठी खेळी करता आली नाही. 


श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अखेरीस दमदार कमबॅक केले. भारतीय संघाला ठरावीक अंतराने धक्के दिले. उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी आणि इनोका रणवीरा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.


दरम्यान, भारतीय महिला संघ आणि श्रीलंकंन महिला संघामध्ये सुवर्णपदकासाठी लढत होत आहे. भारताने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर पाकिस्तान संघाचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. आज सकाळी कांस्य पदकाच्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केला. 


भारतीय संघाची प्लेईंग ११


स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, तितास साधु, राजेश्वरी गायकवाड


श्रीलंका संघात कोण कोण :


चमारी अटापट्टू  (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), विशमी गुणरत्ने, नीलाक्षी डी सिल्वा, हासिनी परेरा, उदेशिका प्रबोधनी, ओशादी रणसिंघे, इनोका रणवीरा, इनोशी प्रियदर्शनी, कविशा दिलहारी, सुगंधिका कुमारी