Virat Kohli Can Break These Record, India vs West Indies : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीची मागील दोन वर्षांपासून कामगिरी सरासरी राहिली आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघत आहे, पण त्याच्याकडून क्रीडा चाहत्यांना मोठी आपेक्षा आहे. आजपासून वेस्ट इंडिजविरोधात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेत विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील. गेल्या काही दिवसांतील कामगिरीमुळे विराट कोहलीची कसोटी सरासरी 50 पेक्षा कमी झाली आहे. असे असतानाही विराट कोहलीला दोन कसोटी मालिकेत अनेक विक्रम मोडण्याची संधी आहे.


150 धावा करताच कॅलिसला मागे टाकणार - 


वेस्ट इंडिजविरोधात पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावात 150 धावा केल्यास जॅक कॅलिसचा विक्रम मोडणार आहे. होय.... 150 धावा करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात विराट कोहली पाचव्या क्रमांकावर पोहचणार आहे. विराट कोहलीच्या नावावर सध्या 25385 आंतरराष्ट्रीय धावा आहेत. विराट कोहलीच्या पुढे असणाऱ्या जॅक कॅलिसच्या नावावर 25534 धावा आहेत. विराट कोहली 150 धावा करताच कॅलिसला मागे टाकणार आहे. 


त्याशिवाय विराट कोहलीने 25 धावा करताचा कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा भारतीय फलंदाज होणार आहे. विराट कोहलीला 8500 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 21 धावांची गरज आहे. विराट कोहली कसोटीत 13 चौकार लगावल्यानंतर तो विदेशात 500 चौकार पूर्ण करणार आहे. 


एक शतक आणि ब्रॅडमन यांची करणार बरोबरी - 
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर 28 शतकांची नोंद आहे. या कसोटी मालिकेत विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर तो डॉन ब्रॅडमन यांच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहे. त्याशिवाय कसोटीत सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या फलंदाजात तो दहाव्या क्रमांकावर पोहचणार आहे. कसोटीत सर्वाधिक शतकांची नोंद सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.  


सचिनच्या खास क्लबमध्ये सामील होणार कोहली -


पहिला कसोटी सामना डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरल्यानंतर विराट कोहली एका खास क्लबमध्ये सामील होणार आहे. क्रिकेट करिअरमध्ये बाप आणि मुलाविरोधात खेळणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहलीचे नाव होणार आहे. याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर याने हा पराक्रम केला आहे. विराट कोहलीने 12 वर्षांपूर्वी वेस्ट इंडिजविरोधात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या संघात शिवनारायण चंद्रपॉल होता... आता वेस्ट इंडिजच्या संघात शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा तेजनारायण खेळत आहे. विराट कोहली बाप आणि मुलाविरोधात खेळणारा भारताचा दुसरा खेळाडू होणार आहे. याआधी सचिन तेंडुलकर याने असा पराक्रम केला आहे. 1992 मध्ये सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाच्या ज्योफ मार्श याच्याविरोधात खेळला होता. त्यानंतर 2011-12 मध्ये सचिन आणि ज्योफ मार्शचा मुलगा शॉन मार्श याच्याविरोधात मैदानात उतरला. विराट कोहली आता सचिन तेंडुलकरच्या खास क्लबमध्ये सामील होणार आहे.