2023 World Cup, IND vs SL Toss Update : श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने वानखेडेच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. श्रीलंका संघाने भारताविरोधात एक बदल केलाय. धनंजय डिसल्वा याला आराम देण्यात आलाय. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ कायम उतरवण्यात आला आहे.
भारतीय संघाची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
श्रीलंका संघाची प्लेईंग 11 -
दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा, दुशान हेमंता आणि दुष्मंता चमीरा
भारत-श्रीलंका हेड टू हेड -
भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला. वनडेतील श्रीलंकेविरोधात भारताची कामगीरी दमदार राहिली आहे.
दोन्ही संघाच्या फलंदाजीत जमीन आस्मानाच फरक -
दोन्ही संघाच्या फलंदाजीत जमीन आस्मानाचा फरक दिसत आहे. भारतीय संघाकडे तगडा अनुभव आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या अनुभवी फलंदाजाच्या जोडीला शुभमन गिल, श्रेयस अय्यर या युवा फलंदाजाची जोड आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी यंदाच्या विश्वचषकात धावांचा पाऊस पाडलाय. शुभमन गिल आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अय्यर आणि राहुलही फॉर्मात आहेत. सूर्या आणि जाडेजाही तळाला धावांचा पाऊस पाडू शकतात. त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी लंकेच्या तुलनेत तगडी आहे. श्रीलंकेच्या फलंदाजीचा विचार केला तर फक्त तीन फलंदाजाची आतापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरेल आहेत. समरविक्रमा, निसंका आणि कुसल मेंडिस यांच्या बॅटमधून धावा निघाल्यात, पण असलंका, परेरा, डीसिल्वा अद्याप रंगात दिसले नाहीत.
गोलंदाजीत काय स्थिती -
वेगवान गोलंदाजी असू किंवा फिरकी गोलंदाजी, भारतीय संघ श्रीलंकेपेक्षा वरचढ आहे. जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकात चेंडूने कमाल केली आहे. बुमराहने 14 विकेट्स घेतल्या आहेत. शामीने दोन सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजला विकेट मिळाल्या नाहीत, पण तो भेदक मारा करत आहे. कुलदीप आणि जाडेजापुढे दिग्गज फलंदाज फेल गेले आहेत. यंदाच्या विश्वचषकात भारताची गोलंदाजी सर्वात तगडी आहे. दुसरीकडे श्रीलंकाकडून फक्त दिलशान मदुशंका आणि कासुन राजिथा विकेट घेण्यात सरासरी कामगीरी केली आहे. पण इतरांना अपयश आलेय. फिरकी विभागातही निराशाच आहे.