कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL ) यांच्यातील पहिली वनडे मॅच रोमांचक झाली. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 230 धावा केल्या होत्या. भारतानं या  धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वबाद 230 धावा केल्या. यामुळं मॅच ड्रॉ झाली. टी 20 मालिकेप्रमाणं सुपरओव्हर नसल्यानं पहिली मॅच ड्रॉ झाली. भारताला विजयासाठी एका रनची गरज असताना शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग पाठोपाठ बाद झाले आणि मॅच ड्रॉ झाली. रोहित शर्मानं आक्रमक सुरुवात करुन दिल्यानंतर इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले आणि भारताला विजयापासून रोखण्यात श्रीलंकेला यश आलं. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मॅच ड्रॉ होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2012 मध्ये एडिलेडमध्ये मॅच ड्रॉ झाली होती. 


रोहित शर्माचं अर्धशतक पण इतर फलंदाजांना अपयश


रोहित शर्माने गेल्यावर्षीचा वनडे वर्ल्ड कप आणि यंदाचा टी 20 वर्ल्ड कपमध्ये ज्या प्रकारे भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली होती. त्या प्रमाणं आज देखील त्यानं आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मानं शेवटची वनडे मॅच 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळली होती. जवळपास नऊ महिन्यांनतर रोहित शर्मा वनडे मॅच खेळला. यामध्ये त्यानं 47  बॉलमध्ये 58  धावा केल्या. रोहित शर्मानं 7 चौकार आणि 3 षटकार मारले. केएल राहुल, अक्षर पटेल, विराट कोहली आणि शिवम दुबे यांनी चांगली सुरुवात करुन मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानं भारतीय संघ विजयापासून एक पाऊल दूर राहिला. 


श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगा आणि चारिथ असलंका यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.  डुनिथ वेलागे यानं दोन विकेट घेतल्या. तीन सामन्यांची टी 20 मालिका गमावल्यानंतर पहिल्या वनडे मॅचमध्ये भारताला विजयापासून दूर ठेवण्यात श्रीलंकेला यश आलं. यामुळं उर्वरित दोन सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो मालिका जिंकू शकतो. आता भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी वनडे मॅच 4 ऑगस्टला पार पडणार आहे.


टीम इंडियाची  प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज


श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन-
पथुन निशांका, अविश्का फर्नांडो, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), सादिरा समराविक्रम, चारिथ असलांका (कर्णधार), झेनिथ लियानगे, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेलागे, अकिला धनंजया, असिश्था फर्नांडो, मोहम्मद शिराज


संबंधित बातम्या:


Rohit Sharma : 'मला काय पाहतोय, तुझ्यासाठी सर्वकाही मी करु', रोहित शर्माकडून वॉशिंग्टन सुंदरची फिरकी, पाहा व्हिडीओ


भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला रोखलं, निसांका- वेलागेच्या अर्धशतकानं डाव सावरला, रोहित सेनेपुढं किती धावांचं आव्हान?