IND vs SL Match Preview : विश्वचषकाच्या रणांगणात रोहित शर्माच्या भारतीय संघाचा सामना आज श्रीलंकेशी होतोय. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारतानं विश्वचषकाच्या मोहिमेत आतापर्यंत सहापैकी सहाही सामने जिंकले आहेत. त्यामुळं विश्वचषकाच्या गुणतालिकेत सर्वाधिक 12 गुणांसह भारत दुसऱ्या स्थानी आहे. पण सातव्या स्थानावरच्या श्रीलंकेला सहापैकी केवळ दोनच सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळं विश्वचषकातलं आव्हान टिकवण्यासाठी श्रीलंकेला बलाढ्य भारतीय संघावर विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यासाठी श्रीलंकेची भिस्त हील प्रामुख्यानं सदीरा समराविक्रमा, पाथुम निसांका आणि कुशल मेंडिस या तीन फलंदाजांवर राहिल. त्या तिघांनीही विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. तसंच दिलशान मधुशंका आणि कासून रजिथा या वेगवान गोलंदाजांचं आक्रमण यशस्वी ठरताना दिसत आहे. पण वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघाच्या विजयाची शक्यता जास्त आहे. भारताने श्रीलंकेला पराभूत केल्यास सेमीफायनलचे तिटिक मिळणार आहे. हा भारताचा सातवा विजय असू शकतो. सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारत फक्त एक विजय दूर आहे. 


भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेतील सहाही सामने एकतर्फी जिंकले आहेत. ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या तगड्या संघाचा पराभव केलाय. दुसरीकडे श्रीलंका संघाला सहा सामन्यात फक्त दोन विजय मिळवता आलेत. त्यांचे गेल्या काही दिवसांतील कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. त्यात प्रमुख खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. अशा स्थितीत श्रीलंका संघाला विजयासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक वाढलेला आहे. स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहाता वानखेडेवर भारतीय संघ विजय मिळवेल, असेच प्रत्येकाला वाटत आहे.


आकडे टीम इंडियाच्या बाजूने -


भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला.  वनडेतील श्रीलंकेविरोधात भारताची कामगीरी दमदार राहिली आहे. त्यामुळे आज बारतीय संघ विजयाचा दावेदार असेल. 


मागील पाच सामन्यातील काय निकाल लागला ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मागील पाच सामन्याचा निकाल एकतर्फी लागलाय. पाचही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आशिया चषकातही भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला होता. 


हेड टू हेड -
वानखेडेवर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामने झाले आहेत. यामध्ये भारताने दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेला फक्त एकदा विजय मिळवता आलाय. दुसरीकडे विश्वचषकात दोन्ही संघ 9 वेळा आमनेसामने आलेत. यामध्ये दोन्ही संघाने प्रत्येकी चार चार विजय मिळवले आहेत. 


फलंदाजीत जमीन आस्मानाच फरक - 
दोन्ही संघाच्या फलंदाजीत जमीन आस्मानाचा फरक दिसत आहे. भारतीय संघाकडे तगडा अनुभव आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या अनुभवी फलंदाजाच्या जोडीला शुभमन गिल, श्रेयस अय्यर या युवा फलंदाजाची जोड आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी यंदाच्या विश्वचषकात धावांचा पाऊस पाडलाय. शुभमन गिल आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अय्यर आणि राहुलही फॉर्मात आहेत. सूर्या आणि जाडेजाही तळाला धावांचा पाऊस पाडू शकतात. त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी लंकेच्या तुलनेत तगडी आहे.  


श्रीलंकेच्या फलंदाजीचा विचार केला तर फक्त तीन फलंदाजाची आतापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरेल आहेत. समरविक्रमा, निसंका आणि कुसल मेंडिस यांच्या बॅटमधून धावा निघाल्यात, पण असलंका, परेरा, डीसिल्वा अद्याप रंगात दिसले नाहीत. 


गोलंदाजीत काय स्थिती -


वेगवान गोलंदाजी असू किंवा फिरकी गोलंदाजी, भारतीय संघ श्रीलंकेपेक्षा वरचढ आहे. जसप्रीत बुमराहने यंदाच्या विश्वचषकात चेंडूने कमाल केली आहे. बुमराहने 14 विकेट्स घेतल्या आहेत. शामीने दोन सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजला विकेट मिळाल्या नाहीत, पण तो भेदक मारा करत आहे. कुलदीप आणि जाडेजापुढे दिग्गज फलंदाज फेल गेले आहेत. यंदाच्या विश्वचषकात भारताची गोलंदाजी सर्वात तगडी आहे. दुसरीकडे श्रीलंकाकडून फक्त दिलशान मदुशंका आणि कासुन राजिथा विकेट घेण्यात सरासरी कामगीरी केली आहे. पण इतरांना अपयश आलेय. फिरकी विभागातही निराशाच आहे.