IND vs SA रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी वनडे रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियममध्ये पार पडली. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 5 बाद 358 धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 359 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेनं चार विकेटनं आणि चार बॉल शिल्लक ठेवत भारतावर विजय मिळवला. यामुळं मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. तिसरा निर्णायक सामना विशाखापट्टणममध्ये 6 डिसेंबरला होणार आहे.
ऋतुराज गायकवाड- विराट कोहलीचं शतक
दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारताचे सलामीवर रोहित शर्मा 14 आणि यशस्वी जयस्वाल 22 धावा करुन बाद झाले. रोहित शर्मा पाचव्या तर यशस्वी जयस्वाल दहाव्या ओव्हरमध्ये बाद झाले. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली.
ऋतुराज गायकवाडनं 83 बॉलमध्ये दोन षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीनं 105 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडचं हे पहिलं शतक होतं. दुसरीकडे विराट कोहलीनं 93 बॉलमध्ये 102 धावा केल्या. विराटनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरं शतक केलं. विराट कोहलीनं सात चौकार आणि दोन षटकार लगावले. विराट कोहलीचं हे 53 वं वनडे शतक तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 84 वं शतक होतं. वॉशिंग्टन सुंदर केवळ 1 रन करुन बाद झाला.
कॅप्टन केएल राहुल आि रवींद्र जडेजानं सहाव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. केएल राहुलनं 43 बॉलमध्ये नाबाद 66 धावा केल्या. त्यानं 6 चौकार आणि 2 षटकार मारले. जडेजानं 27 बॉलमध्ये 24 धावा केल्या.दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यानसेनं यानं 2 आणि एनगिडी आणि नांद्रे बर्गरनं एक एक विकेट घेतली.
एडन मार्करमचं शतक
भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 359 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आफ्रिकेनं 26 धावांवर डिकॉकच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन टेम्बा बावुमा 46 धावा करुन बाद झाला. डेवाल्ड ब्रेविसनं 54 धावा केल्या. एडन मार्करम यानं 110 धावा केल्या. तर, ब्रीत्झकेनं 68 धावा केल्या. बॉश आणि केश महाराज यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामर्तब केलं. भारताकडून प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक धावा दिल्या. त्यानं 2 विकेट घेतल्या.
तिसरी वनडे विशाखापट्टणममध्ये
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी वनडे आता विशाखापट्टणममध्ये होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया तिसरा सामना जिंकणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय. त्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिकेला सुरुवात होईल. त्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे.