मुंबई : अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे.  नियमित कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर दोघेही दुखापत ग्रस्त असल्यानं निवड समितीनं कर्णधार म्हणून केएल राहुलवर जबाबदारी सोपवली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाहीर झालेल्या भारताच्या संघाकडे पाहिलं असता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडेचा संघ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा वनडे संघ यात फरक दिसून येतो. 

Continues below advertisement

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडला लॉटरी

महाराष्ट्राचा खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडला बऱ्याच कालावधीनंतर टीम इंडियाच्या मुख्य संघात संधी मिळाली आहे. शुभमन गिल दुखापत ग्रस्त असल्यानं निवड समितीनं ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. ऋतुराज गायकवाड 705 दिवसानंतर भारतीय संघात कमबॅक करेल. भारताचा विकेटकीपर रिषभ पंत देखील दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा वनडे संघात दाखल झाला आहे. इंग्लंडमधील कसोटी मालिकेत रिषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. रिषभ पंत सध्या दुसऱ्या कसोटी भारताचं नेतृत्त्व करतोय. 

ऑस्ट्रेलियातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत निवड समितीनं अक्षर पटेलला संधी दिली होती. मात्र, भारतात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याला वगळण्यात आलं आहे. अक्षर पटेलच्या जागी रवींद्र जडेजानं कमबॅक केलं आहे. 

Continues below advertisement

संजू सॅमनसची संधी हुकली

शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्यामुळं संजू सॅमसनला वनडे संघात संधी मिळू शकली असती मात्र निवड समितीनं ऋतुराज गायकवाडला संधी दिली. आता रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न कायम आहे. यशस्वी जयस्वाल की ऋतुराज गायकवाड या पैकी एकाला संधी मिळू शकते. 

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला विश्रांती

वनडे मालिकेत वेगवान गोलंदाज म्हणून निवड समितीनं युवा खेळाडूंना संधी दिली आहे. अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आली आहे. तर, आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजला विश्रांती दिलेली असू शकते. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सध्या कसोटी मालिकेत खेळत आहेत. 

वनडे मालिकेसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन, विकेटकीपर),रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल, 

वनडे मालिकेचं वेळापत्रक 

30 नोव्हेंबर : पहिली वनडे, रांची 3 डिसेंबर : दुसरी वनडे, रायपूर6 डिसेंबर : तिसरी वनडे, विशाखापट्टणम