Ind vs SA, 1st Test Match : सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. (INDIA WON BY 113 RUNS) या विजयासह तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.  सेंच्युरियन मैदानावर यजमानांचा पराभव करणारा भारत आशियातील पहिला तर जगातील तिसरा संघ ठरला आहे. याआधी सेंच्युरियनवर यजमानांना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं. आता हा कारनामा भारतीय संघाने केला आहे. सांघिक खेळाच्या जोरावर भारतीय संघाने ऐतिहासिक विजय साजरा केला. फलंदाजांनी आपलं काम चोख बजावल्यानंतर गोलंदाजांनी त्यांना चांगली साथ दिल्यामुळे अशक्यप्राय विजय मिळवता आला. या विजयाची पाच कारणे आपण जाणून घेऊयात.... (INDIA TOUR OF SOUTH AFRICA TEST SERIES 2021-22)


1) राहुलचं झुंझार शतक - 
उपकर्णधार के. एल. राहुलने (K L Rahul) पहिल्या डावात झळकावलेलं झुंझार शतकाच्या बळावर पहिल्या डावात भारतीय संघाला मोठी आघाडी घेता आली. कठीण परिस्थितीत राहुलने 260 चेंडूचा सामना करत 123 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान राहुलने 17 चौकार आणि एक षटकार लगावला. 


2) राहुल-मयांकची भागिदारी - 
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुल आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) यांनी सलामीची भूमिका पार पाडली. मयांक आणि राहुल यांनी केलेली 117 धावांची सलामीची भागादारीने भारतीय संघाचा पाया रचला. या भागादीरीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावांत 327 धावा केल्या. मयांक अग्रवालने 60 धावांची खेळी केली. 


3) शमीचा भेदक मारा - 
वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर मोहम्मद शमीने (Mohammed Shami) भेदक मारा केला. पहिल्या डावांत शमीने पाच तर दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावात गोलंदाजी दरम्यान जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी झाला होता. जसप्रीत बुमराहाच्या अनुपस्थितीत शमीने दक्षिण आफ्रिकाच्या फलंदाजांना बाद केलं. अचूक टप्यावर मारा करत शमीने आफ्रिकेच्या फंलदाजांना माघारी धाडलं. मार्करम, पीटरसन, बवुमा, मुल्डर आणि कगिसो रबाडा यांना पहिल्या डावांत बाद केलं. तर दुसऱ्या डावांत मार्करम, मुल्डर आणि जेन्सन यांना बाद केलं. दोन्ही डावात शमीने आठ बळी घेत विजयात मोलाची भूमिका पार पाडली. 


4) सिराज-बुमराहची साथ
सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केली. बुमराह, सिराज, शार्दुल आणि अश्विन यांनी शमीला चांगली साथ दिली. बुमराहने पाच, सिराजने तीन, शार्दुल ठाकूर आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांच्या धारधार माऱ्यामुळे पहिल्या डावांत दक्षिण आफ्रिकेचा डाव 197 तर दुसऱ्या डावात 191 धावांवर संपुष्टात आला. 


5) अजिंक्य रहाणे - पंतची छोटेखानी खेळी - 
मोक्याच्या क्षणी अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या छोटेखानी खेळी भारतीय संघासाठी महत्वाच्या ठरल्या. पहिल्या डावात अजिंक्य रहाणेनं मोक्याच्या क्षणी 48 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. भारताचा दुसरा डाव कोसळत असताना ऋषभ पंत याने केलेली 34 धावांची खेळीमुळे भारताची धावसंख्या 174 पर्यंत पोहचली. एका बाजूला फलंदाज बाद होत असताना पंतने झटपट 34 चेंडूत 34 धावा चोपल्या. 



स्कोअरकार्ड -


भारताचा पहिला डाव - सर्वबाद 327 धावा
दक्षिण आफ्रिका पहिला डाव - सर्वबाद 197 धावा
भारताचा दुसरा डाव - सर्वबाद 174 धावा
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव - सर्वबाद 191 धावा
भारताचा 113 धावांनी विजय