IND vs PAK, World Cup 2023 :  ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यानंतर पाकिस्तानसोबत दोन हात करण्यासाठी भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी भारतीय संघाने दिल्लीमध्ये अफगाणिस्तान संघाचा दारुण पराभव केला. रोहित शर्माच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने अफगाणिस्तानला आठ विकेट आणि 15 षटके राखून पराभूत केले. आता विश्वछषकातील तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाने अहमदाबाद गाठले आहे. 4 वाजण्याच्या आसपास भारतीय संघ अहमदाबाद विमानतळावर दाखल झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


 भारत आणि पाकिस्तान याच्यातील हायव्होल्टेज सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी या दोन्ही संघामध्ये आमनासामना होणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ आधीच अहमदाबादमध्ये दाखल झाला. आज भारतीय संघ  अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघ लवकरच सरावाला सुरुवात करेल. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे, सलामी फलंदाज शुभमन गिल याने डेंग्यूवर मात केली आहे. त्याने सरावालाही सुरुवात केली आहे. शुभमन गिल याने एक तासांपेक्षा जास्त वेळ नेट्समध्ये सराव केला. पाकिस्तानविरोधात शुभमन गिल खेळल्यास भारताची ताकद आणखी वाढणार आहे. 


भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 






भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रंजक आकडेवारी -


भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 134 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारताने 56 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. म्हणजे, एकदिवसीय सामन्यांचा इतिहास पाहता पाकिस्तानचे पारडे जड दिसत आहे. मागील दोन दशकांपासून भारताचे पारडे जड आहे. 


एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्याचा निकाल लागला नाही. आजपर्यंत एकही सामना बरोबरीत सुटलेला नाही.


भारताने आपल्या घरच्या मैदानावर पाकिस्तानचा 11 सामन्यात पराभव केला आहे.  तर पाकिस्तान संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर 14 वेळा भारताचा पराभव केला आहे.


भारतने पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचा 11 वेळा पराभव केला आहे. तर पाकिस्तान संघाने भारताचा भारतीय मैदानावर 19 वेळा पराभव केला आहे.  


न्यूट्रल ठिकाणी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जास्त सामने झाले आहेत.  त्रयस्त ठिकाणी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 34 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान संघाने 40 वेळा बाजी मारली आहे.  


विश्वचचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत सात वेळा सामना झाला आहे. या सातही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघाला आतापर्यंत एकदाही भारतीय संघावर विजय मिळवता आला नाही.