India vs Pakistan Colombo Weather Report Update : पाकिस्तान सरकारने आपल्या निर्णयावर यू-टर्न घेत अखेर संघाला टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताविरुद्ध खेळण्याची परवानगी दिली. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना नियोजित वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे रंगणार आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर प्रथमच हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. भारताची टीम आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, तर पाकिस्तान मागील पराभवाचा बदला घेण्याच्या निर्धाराने खेळेल.

Continues below advertisement

कोलंबोतील हवामान कसे असेल? (Will it rain during the match on Sunday in Colombo)

कोलंबोमध्ये सध्या हवामान सतत बदलत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 14 फेब्रुवारीदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीलाही दिवसभर सुमारे 17 टक्के पावसाचा अंदाज आहे. तसेच सुमारे 28 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे सायंकाळी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता अत्यल्प असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना संपूर्ण सामना पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

Continues below advertisement

भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड (India vs Pakistan Head to Head Record)

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण 13 सामने झाले आहेत. त्यापैकी भारताने तब्बल 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला केवळ 3 विजय मिळवता आले आहेत. मागील आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग तीन विजय मिळवले होते.

सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा हा दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, पाकिस्तान संघानेही या स्पर्धेत सलग दोन विजय नोंदवले आहेत. त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक होण्याची शक्यता आहे.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

टी-20 विश्वचषक 2026 साठी पाकिस्तान संघ : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक.

हे ही वाचा -

Ind vs Pak Playing XI : भारत विरुद्ध पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना; वर्ल्डकप विजेत्या खेळाडूने निवडली टीम इंडियाची चक्रावणारी Playing XI, कोण OUT?