दुबई : भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 6 विकेटनं पराभूत केलं आहे. भारतानं या विजयासह 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवाचा वचपा काढला. विशेष बाब म्हणजे विराट कोहलीनं नाबाद 100 धावा करत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयामुळं भारताचं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. भारताच्या या विजयामध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या अक्षर पटेलनं मैदानावर विराट कोहलीसोबत फलंदाजी करत असताना तो काय विचार करत होता ते सांगितलं. एका बाजूनं धावा कमी होत होत्या आणि विराट कोहली शतकाजवळ पोहोचला होता. त्यामुळं भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसह कोट्यवधी चाहत्यांना विराट कोहलीचं शतक पूर्ण होणार की नाही याची उत्सुकता लागली होती. याबाबत अक्षर पटेल काय विचार करत होता ते त्यानं सांगितलं आहे.
शेवटपर्यंत विराटभाईच्या शतकासाठी गणित
अक्षर पटेलनं मॅच संपल्यानंतर म्हटलं की शेवटी मी विराटभाईच्या शतकाबाबत विचार करत होतोय. मी फलंदाजी कत असताना बॉल माझ्या बॅटला लागू नये, याचा विचार करत होतो. एकूणच मला खूप मजा आली, असं अक्षर पटेल म्हणाला.
अक्षर पटेलची दमदार कामगिरी
पाकिस्ताननं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं चांगली सुरुवात केली होती. मात्र, हर्षित राणानं बाबर आझमची विकेट घेतली. त्यानंतर अक्षर पटेलच्या अफलातून थ्रोच्या जोरावर इमाम उल हक धावबाद झाला. यानंतर पाकिस्तानचे फलंदाज सऊद शकील आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी डाव सावरला होता. दोघांची भागिदारी भारताचं टेन्शन वाढणार असं दिसत असतानाच अक्षर पटेलनं शकीलची विकेट घेतली. यानंतर पाकिस्तानचा डाव गडगडला.
भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
भारताच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 241 धावांवर रोखलं. यानंतर भारतानं फलंदाजी करताना 6 विकेटनं पाकिस्तानवर विजय मिळवला. भारताकडून विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांनी संयमी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभूत करत भारतानं स्पर्धेत दोन विजय मिळवले आहेत. भारत या विजयासह अ गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तान सलग दोन पराभवांमुळं स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारत आणि बांगलादेशच्या कामगिरीवर पाकिस्तानचं भवितव्य अवलंबून आहे.
इतर बातम्या :