India VS Pakistan Asian Games 2026 Final : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील क्रिकेटच्या सुवर्णपदकासाठी रंगलेल्या महामुकाबल्यात टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. जपानमध्ये खेळल्या जात असलेल्या या हायव्होल्टेज सामन्यात भारताने 20 षटकांत 6 गडी गमावत 211 धावा केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारताने तब्बल 14 वर्षांपूर्वीचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. 2012 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध 192 धावा केल्या होत्या. आता 211 धावांसह भारताने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Continues below advertisement

अभिषेक-तिलकची वादळी फलंदाजी 

Continues below advertisement

भारताच्या डावाची सुरुवात वैभव सूर्यवंशीने केली. मात्र त्याला 9 चेंडूत 15 धावांवर माघारी पाठवण्यात पाकिस्तानला यश आले. त्यानंतर अभिषेक शर्माने मैदानात वादळ निर्माण केलं. अभिषेकने अवघ्या 28 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 61 धावांची तुफानी खेळी केली. अभिषेक बाद झाल्यानंतर संजू सॅमसनलाही मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या 2 धावांवर बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 21 धावा केल्या. त्यानंतर इशान किशनने 18 चेंडूत 20 धावांची खेळी केली.

तिलक वर्माने शेवटच्या षटकांत उडवली धूम

डावाच्या अखेरीस तिलक वर्माने पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. तिलकने अवघ्या 22 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 231.82 इतका राहिला. तिलकला शिवम दुबेचीही चांगली साथ मिळाली. दुबेने 15 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 धावा फटकावल्या. अक्षर पटेल 1 धावेवर नाबाद राहिला.

फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्टीवर 211 धावा 

या सामन्यातील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करत असल्याचं पाहायला मिळालं. अशा परिस्थितीत भारतीय फलंदाजांनी 20 षटकांत 211 धावा उभारत पाकिस्तानसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. आता सुवर्णपदकाच्या या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 212 धावांची गरज आहे. भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानी फलंदाज हे लक्ष्य गाठतात की भारताच्या विक्रमी फलंदाजीनंतर गोलंदाजही सामना आपल्या बाजूने झुकवतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा -

IND vs PAK Asian Games 2026 Final : वैभवला पाहून पाक खेळाडूने नको ते कृत्य केलं, अभिषेकने धू धू धुतलं; पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?, VIDEO