Ind Vs Pak Asia Cup Final: आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 स्टेजच्या निर्णायक सामन्यात पाकिस्तानी संघाने बांगलादेशचा 11 धावांनी पराभव केला. या विजयामुळे पाकिस्तानी संघाने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत (Asia Cup Final) धडक मारली. त्यामुळे येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान (Ind Vs Pak) यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला सहजपणे धूळ चारली होती. मात्र, गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या खेळातील त्रुटीही समोर आल्या होत्या. पाकिस्तानी संघ (Pakistan) हा बेभरवशी म्हणून प्रसिद्ध आहे. हा संघ कोणत्याही क्षणी उसळी घेऊन कामगिरी उंचावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे टीम इंडियाला (Team India) अंतिम सामन्यात काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
Team India: गचाळ क्षेत्ररक्षण
विराट कोहली कर्णधार असताना भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण ही जमेची बाजू होती. मात्र, आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली खेळत असलेल्या टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण चिंतेचा विषय ठरला आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडुंनी एकूण 12 झेल सोडले आहेत. यापैकी आठ झेल हे गेल्या दोन सामन्यांमध्ये सोडले आहेत. अनेक सोपे झेलही भारतीय खेळाडुंनी सोडल्याचे दिसून आले. अंतिम सामन्यात झेल सोडण्याची मालिका कायम राहिल्यास भारतीय संघ अडचणीत सापडू शकतो.
Abhishek Sharma: अभिषेक शर्मा- शुभमन गिल दोघांवरच संघाची मदार
आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे दोघे वगळता इतर भारतीय फलंदाजांना विशेष कामगिरी करता आलेली नाही. संजू सॅमसनने झळकावलेले अर्धशतक याला अपवाद आहे. मात्र, उर्वरित सामन्यांचा विचार करता टीम इंडियाची संपूर्ण मदार अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावरच राहिली आहे. या दोघांनी जवळपास प्रत्येक सामन्यात भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. अभिषेक शर्मा सध्या टॉप फॉर्ममध्ये असून कोणत्याही गोलंदाजाला त्याला रोखण्याचा उपाय सापडलेला नाही. या दोघांच्या चांगल्या सुरुवातीमुळे इतर भारतीय फलंदाजांचा म्हणावा तसा कस लागलेला नाही किंवा त्यांचे अपयश लपून गेले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोघांवरच अवलंबून राहणे, भारतीय संघाला धोकादायक ठरु शकते. हे दोघे लवकर बाद झाल्यास मधल्या फळीतील फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल.
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचे अपयश
सूर्यकुमार यादव हा भारतीय संघाचा कर्णधार आहे. मिस्टर 360 अशी ओळख असलेला सूर्यकुमार यादव मैदानात कुठेही फटके मारु शकतो. मात्र, या स्पर्धेत अद्याप त्याला सूर गवसलेला नाही. गिल आणि अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजासाठी मैदानात आलेल्या सूर्याने कोणतीही विशेष कामगिरी केलेली नाही. गेल्या नऊ सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने अवघ्या 87 धावा केल्या आहेत. तर आशिया कपमधील सूर्याच्या फलंदाजीची सरासरी 29.50 आणि स्ट्राईक रेट 111.32 इतका राहिला आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवला सूर गवसणे महत्त्वाचे आहे.
Team India Batting order: फलंदाजीतील प्रयोग बंद करण्याची गरज
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने फलंदाजीत अनेक प्रयोग केले आहेत. विराट कोहलीनंतर सूर्यकुमार यादव हा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो. मात्र, आशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवने तिसर्या क्रमांकाबाबत अनेक प्रयोग गेले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शिवम दुबे याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आणण्यात आले होते. तर संजू सॅमसन फलंदाजीसाठी मैदानात उतरलाच नव्हता. ओमानविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव शेवटपर्यंत बॅटिंगलाच आला नाही. हे अतिप्रयोग अंतिम सामन्यात टीम इंडियाला धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रत्येक भारतीय फलंदाजाने ठरलेल्या क्रमांकावरच फलंदाजीसाठी येणे गरजेचे आहे.
Indian Team: बेंच स्ट्रेंथचा योग्य वापर करण्याची गरज
भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. सगळ्यांना अंतिम 11 मध्ये स्थान मिळत नाही. भारतीय संघाकडे अनेक चांगले राखीव खेळाडू आहेत. हे खेळाडू अंतिम सामन्यात गेमचेंजर ठरु शकतात. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात फार प्रयोग न करता भरवशाच्या खेळाडूंनाच संधी देणे योग्य ठरेल. तसेच अंतिम सामन्यातील संघ हा संतुलित असेल, याचीही भारतीय टीम मॅनेजमेंटला काळजी घ्यावी लागेल.
आणखी वाचा
भारत-पाक फायनलपूर्वी टीम इंडियाला झटका? सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागणार का?