Virat Kohli Stats : मुंबईचं ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झालंय विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीसाठी. या सामन्यात यजमान भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. विश्वचषकाच्या साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात भारताला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. भारतानं विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात  नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर उभय संघ वानखेडेच्या मैदानात आमनेसामने येत आहेत. आज वानखेडेच्या मैदानात विराट कोहलीकडे सचिनचे दोन विक्रम मोडण्याची संधी आहे. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारा फलंदाज ठरु शकतो. त्याशिवाय त्याला आणखी एक विक्रम मोडण्याची संधी असेल.


सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीच्या निशाण्यावर सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम आहे. मागील 20 वर्षांपासून हा रेकॉर्ड अबाधित आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली सचिनचा विक्रम मोडणार का? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 674 धावा केल्या होत्या. 20 वर्षांनंतरही हा विक्रम अद्याप कुणालाही मोडता आलेला नाही. आता विराट कोहली या रेकॉर्डच्या जवळ पोहचला आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीकडे हा रेकॉर्ड मोडण्याची मोठी संधी आहे.


विराट कोहलीकडे सचिनचा मोठा विक्रम मोडण्याची संधी -
विराट कोहलीने सध्याच्या विश्वचषकात 9 सामन्यात 594 धावांचा पाऊस पाडला आहे. विश्वचषकातील सर्वाधिक धावांच्या विक्रमापासून विराट कोहली फक्त 80 धावा दूर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 674 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी विराटला सेमीफायनलच्या सामन्यात मोठी खेळी करावी लाघणार आहे. भारताने उपांत्य फेरीत विजय मिळवला, तर विराटकडे हा रेकॉर्ड तोडण्यासाठी दोन सामने मिळतील. विराट कोहलीकडे सचिनचा रेकॉर्ड मोडण्याची नामी संधी आहे.


एका विश्वचषकात सर्वाधिक धावा -
एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 673 धावांचा पाऊस पाडला होता. हा विक्रम आजही अबाधित आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन आहे, त्याने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये 659 धावा केल्या होत्या. 2019 मध्ये रोहित शर्मा या विक्रमाच्या जवळ पोहचला, पण मोडता आला नाही. यंदाच्या विश्वचषकात सचिनचा हा विक्रम अबाधित राहणार की मोडणार, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.


विश्वचषकात भारतीय फलंदाजांचा दबदबा -
यंदाच्या विश्वचषकात भारतीय फलंदाजांचा दबदबा दिसला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी खोऱ्याने धावा काढल्या. त्याशिवाय श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनीही मोठं योगदान दिले. विराट कोहलीने आतापर्यंत 594 धावा केल्या आहेत. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. या यादीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 501 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यरने नऊ सामन्यात 421 धावा केल्या आहेत. केएल राहुलने चमकदार कामगिरी केली आहे. राहुलने 400 च्या आसपास धावा केल्या आहेत.