T20 WC 2021, IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे. सामन्यापूर्वी संघातील खेळाडूंनी जोरदार सराव केला. अलीकडेच, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सोशल मीडियावर काही लोकांनी लक्ष्य केले होते, ज्याबद्दल संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) मोठे वक्तव्य समोर आले आहे. कोहलीने मोहम्मद शमीचे नाव न घेता अशा लोकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे शमीवर निशाणा साधल्यानंतर क्रिकेट जगतातील सर्व दिग्गजांनी त्याला पाठिंबा दिला. आता भारताच्या कर्णधाराने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
विराट कोहली काय म्हणाला?
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली म्हणाला, "आमचे संपूर्ण लक्ष सामन्यावर आहे, बाहेरील नाट्यावर नाही. काही लोक सोशल मीडियावर आपली ओळख लपवून अशी कृत्ये करतात. आजच्या काळात असे करणे सामान्य झाले आहे. आम्ही आमच्या ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण ठेवतो आणि सर्वजण एकत्र असतात." विराट कोहली म्हणाला की, "धर्माच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करणे पूर्णपणे चुकीचे आहे. मी आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीला अशी वागणूक दिलेली नाही. काही लोकच असं करतात." कोहली पुढे म्हणाला, "जर कोणाला मोहम्मद शमीच्या खेळातील पॅशन दिसत नसेल तर मला त्या लोकांवर वेळ वाया घालवायचा नाही."
विराट कोहली म्हणाला, "पराभवाबद्दल चाहते काय विचार करत आहेत किंवा देशातील लोक काय विचार करत आहेत याची आम्हाला चिंता नाही. टीम सध्या न्यूझीलंडच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहे. सोशल मीडियावर जे लोक खेळाडूंना लक्ष्य करत आहेत. त्यांच्यासाठी वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. जे लोक खेळाडूंच्या धर्मावर भाष्य करतात ते समाजात विष पसरवत आहेत. खेळाडूंची खिल्ली उडवणे चुकीचे आहे. प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. एका सामन्यातून सर्व काही बिघडत नाही."
शार्दुलला संधी नाहीच
हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्यामुळे गोलंदाजी करु शकत नाही, त्यामुळे पुढील सामन्यात त्याच्या जागी मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी दिली जाणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, सुत्रांच्या हवाल्यानं मिळालेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाच्या संघात कोणताही बदल होणार नाही. पाकिस्तानविरोधात उतरलेला संघ रविवारी मैदानात उतरणार आहे.
स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक
31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड
3 नोव्हेंबर: भारत विरुद्ध अफगाणिस्तान
5 नोव्हेंबर: भारत वि स्कॉटलॅंड
नोव्हेंबर 8: नामिबिया वि भारत