India vs New Zealand 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडने भारतीय संघासमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले. विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खडतर झाली. पण एका विलक्षण घटनेने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज जॅक फॉल्क्सच्या एका चेंडूवर चक्क 11 धावा आल्या.
नेमकं काय घडलं?
भारतीय डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी जॅक फॉल्क्स आला. यावेळी क्रीझवर इशान किशन होता. फॉल्क्सच्या या षटकाची सुरुवात अत्यंत खराब झाली. फॉल्क्सने पहिला चेंडू टाकला जो 'नो-बॉल' ठरला आणि त्यावर इशान किशनने शानदार चौकार ठोकला. फ्री-हिटच्या दबावाखाली फॉल्क्सने पुढचे दोन चेंडू सलग 'वाईड' टाकले. अखेर जेव्हा त्याने नीट चेंडू टाकला, त्यावर इशान किशनने पुन्हा एकदा चौकार वसूल केला. अशाप्रकारे, एका चेंडूच्या खेळात एकूण 11 धावा फलकावर लागल्या. हे दृश्य पाहून सगळेच अवाक झाले.
सलामीवीर स्वस्तात माघारी
209 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. अवघ्या 7 चेंडूच्या आत भारताने आपले दोन्ही सलामीवीर गमावले. फॉर्मात असलेला अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला, तर संजू सॅमसनला केवळ 6 धावा करता आल्या. सुरुवातीच्या या धक्क्यानंतर इशान किशनने धावांचा पाऊस पाडला. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा निर्णय न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. किवी संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 208 धावांचा डोंगर उभा केला.
हे ही वाचा -
