India vs New Zealand 2nd T20I : भारतीय संघाची टी-20 विश्वचषक 2026 साठीची तयारी जोरात सुरू आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकत भारताने मालिकेत आघाडी घेतली असून आता दुसऱ्या सामन्याची उत्सुकता आहे. हा सामना आज शुक्रवार, रायपूर येथे रंगणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला दिसतो. मात्र या सामन्यापूर्वी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अक्षर पटेलची दुखापत ठरतेय डोकेदुखी
दुसऱ्या टी-20पूर्वी टीम इंडियासाठी चिंतेची बाब समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांना पहिल्या सामन्यात फील्डिंग करताना बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. बीसीसीआयकडून अद्याप त्यांच्या फिटनेसबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जर अक्षर दुसऱ्या टी-20मध्ये खेळू शकले नाहीत, तर कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते, ज्यामुळे भारताचा फिरकी हल्ला आणखी मजबूत होईल.
नागपूरमधील विजयाने वाढला आत्मविश्वास
पहिल्या टी-20मधील भारताच्या विजयाचा हिरो अभिषेक शर्मा ठरला होता. त्याने अवघ्या 35 चेंडूमध्ये 84 धावांची तुफानी खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. शेवटी रिंकू सिंह याने 20 चेंडूंमध्ये नाबाद 44 धावा करत भारताची धावसंख्या भक्कम केली. दुसऱ्या सामन्यातही ओपनिंग जोडीकडून अशाच आक्रमक सुरुवातीची अपेक्षा असेल.
ओपनिंगपासून मिडल ऑर्डरपर्यंत तगडी फलंदाजी
फलंदाजी क्रम पाहता, अभिषेक शर्मासोबत पुन्हा एकदा संजू सॅमसन ओपनिंग करताना दिसू शकतो. ईशान किशन पहिल्या सामन्यात अपयशी ठरला असला तरी टी20 वर्ल्ड कपच्या संभाव्य संघात असल्याने त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यात 32 धावा करत फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. मधल्या फळीत हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे संघाला संतुलन देतील.
गोलंदाजीत बुमराह-अर्शदीपकडून अपेक्षा
जर अक्षर पटेल बाहेर राहिले, तर रिंकू सिंहवर फिनिशरची जबाबदारी अधिक वाढेल. गोलंदाजीत कुलदीप यादवसोबत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती महत्त्वाची भूमिका बजावतील. विशेषतः बुमराह आणि अर्शदीपकडून नव्या चेंडूने सुरुवातीलाच विकेट्स मिळवण्याची अपेक्षा भारतीय संघाला असेल.
टीम इंडियाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
हे ही वाचा -
