IND vs ENG : रविचंद्रन अश्विन (106) चं धडाकेबाज शतक आणि कर्णधार विराट कोहली (62) ची अर्धशतकी खेळीच्या मदतीने टीम इंडियाने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी आपल्या दुसऱ्या डावात 286 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियानं सध्या इंग्लंडसमोर 482 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.


टीम इंडियाने पहिल्या डावात 329 धावांची खेळी केली होती. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केवळ 134 धावांवर गुंडाळला. त्यानंतर टीम इंडियाला 195 धावांची आघाडी मिळाली होती. टीम इंडियाने अश्विनच्या कसोटी क्रिकेटमधील पाचव्या शतकाच्या बळावर इंग्लंडसमोर आव्हान ठेवलं आहे. ही तिसरी संधी आहे, जेव्हा अश्विनने एकाच कसोटीत शतक झळकावत पाच विकेट्सही घेतले आहेत.





अश्विनने जेव्हा शतक झळकावलं होतं, त्यावेळी सर्वजण त्याचं कौतुक करत होते. दरम्यान, एक व्हिडीओ अत्यंत व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे, मोहम्मद सिराजचा. दरम्यान, जेव्हा अश्विनने शतक झळकावलं, त्यावेळी त्याच्यासोबत क्रिजवर मोहम्मद सिराज होता. जसं अश्विनने 82व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर शतक झळकावलं तर सिराजनेही मैदानात अश्विनचं शतक साजरं केलं. अनेक युजर्सनी हे पाहून म्हटलं की, यालाच टीमचा सपोर्ट म्हणतात.


अश्विनची शतकी खेळी


रविचंद्रन अश्विन या खेळाडूच्या शतकीय खेळीच्या बळावर भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंडच्या संघापुढं तगडं आव्हान ठेवलं. अश्विननं आतापर्यंत एकाच कसोटी सामन्यात तिसऱ्यांदा पाच गडी बाद करत शतकीय खेळी केली आहे. भारतीय संघाच्या दुसऱ्या खेळीमध्ये त्यानं 148 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि 1 षटकाराच्या बळावर 106 धावा केल्या. तर, विराट कोहलीनं 149 चेंडूंमध्ये 7 चौकारांच्या मदतीनं 62 धावा झळकावल्या. दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या 96 धावांच्या भागीदारीमुळं इंग्लंडच्या संघापुढं चांगली धावसंख्या उभी करण्यात संघाला यश आलं.


तिसऱ्या दिवसअखेर भारताची स्थिती भक्कम, इंग्लंडचे 3 खेळाडू तंबूत परत


एम.ए. चिदंबरम स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर इंग्लंडपुढं चांगलीच आव्हानं उभी राहिली आहेत. तिसऱ्या दिवसअखेर खेळ संपतेवेळी इंग्लंडची धावसंख्या 3 गडी बाद 53 धावा इतकी होती. त्यामुळं पाहुण्यांचा संघ काहीसा डगमगताना दिसला.


महत्त्वाच्या बातम्या :