England vs India 5th Test Update : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी, जेव्हा मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा ओव्हलवर गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले, तेव्हा त्यांच्या खांद्यावर 125 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे होते. जेव्हा दोघांनीही या ओझ्यासह चेंडू घेऊन धावण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी केवळ गोलंदाजीच केली नाही तर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात रोमांचक कहाणी लिहिली. दोघांनीही जोश आणि उत्साहाने वेगवान गोलंदाजीची इतकी ताकद दाखवली की बॅझबॉलचा 'बँड' वाजू लागला. दोघांच्या 'वॉबल-सीम डिलिव्हरीने' इंग्लंडची हवा काढली आणि त्यांना ६ धावांनी पराभूत केले.
यासह भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत आणली. भारतासाठी ही विजयाची कसोटी ठरली. या सामन्यातल्या विजयानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने म्हटलं की, "जेव्हा तुमच्याकडे प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज असतात, तेव्हा कर्णधार म्हणून काम करणं खूपच सोपं होतं." गिलने ही मालिका सर्वाधिक 754 धावा करून पूर्ण केली आणि त्याला मालिकावीर (Player of the Series) म्हणून गौरवण्यात आलं.
शुभमन गिलने ओव्हलमधील विजयावर काय प्रतिक्रिया दिली?
भारतीय कसोटी कर्णधार शुभमन गिल म्हणाला, "दोन्ही संघांनी पूर्ण मालिकेत अफलातून क्रिकेट खेळलं. दोन्ही टीम्स आपल्या सर्वोत्तम खेळासह उतरल्या होत्या, आणि आज आम्ही विजयी बाजूला उभं आहोत, याचा आनंद आहे. जेव्हा तुमच्याकडे सिराज आणि प्रसिद्धसारखे गोलंदाज असतात, तेव्हा कर्णधारासाठी निर्णय घेणं खूप सोपं जातं." गिलने पुढे सांगितलं, "हो, आमच्यावर खूप दबाव होता, पण या दोघांनीही जबरदस्त गोलंदाजी करत सामना आमच्या बाजूला वळवला."
या मालिकेतून गिलने काय शिकलं?
शुभमन गिलला जेव्हा विचारण्यात आलं की या सहा आठवड्यांच्या मालिकेतून तू काय शिकलास, तेव्हा गिल म्हणाला की, "कधीही हार मानू नका (Never Give Up)." भारताने पाचवा कसोटी सामना अशा स्थितीत जिंकला, जेव्हा त्यांची विजयाची शक्यता फारशी नव्हती. पाचव्या दिवसाची सुरुवात इंग्लंडला केवळ 35 धावा हव्या होत्या, तर भारताला 4 विकेट्स मिळवायच्या होत्या. अशा कठीण क्षणीही भारताने शेवटपर्यंत लढा दिला आणि इंग्लंडला अवघ्या 6 धावांनी पराभूत करत मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. भारताने शेवटपर्यंत आशा सोडली नाही आणि अखेर सामना आपल्या बाजूने फिरवला.
हे ही वाचा -