IND vs ENG 1st ODI Weather Forecast : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका संपल्यानंतर आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवार, 14 जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यावरही पावसाचे सावट राहणार का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. यंदाच्या वनडे मालिकेत भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे या दोन्ही दिग्गज फलंदाजांना मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत पाऊस पडल्यास सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने चाहत्यांची चिंता वाढली होती.

Continues below advertisement

कसं असेल बर्मिंगहॅममधील हवामान? (IND vs ENG 1st ODI Weather Forecast)

हवामान अंदाजानुसार भारत-इंग्लंड पहिल्या वनडेदरम्यान पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. अॅक्युवेदरच्या ताज्या अंदाजानुसार सामन्यादरम्यान केवळ 1 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामना पूर्ण 50 षटकांचा होण्याची शक्यता अधिक आहे. स्थानिक वेळेनुसार सामना सकाळी 11 वाजता, तर भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे. सामन्यावेळी वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याचा अंदाज असून, आकाशात काही प्रमाणात ढग असतील.

Continues below advertisement

तापमान आणि खेळपट्टीवर काय परिणाम?

सामन्यादरम्यान बर्मिंगहॅममध्ये सुमारे 28 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. तसेच ताशी सुमारे 22 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे. आकाशात ढगाळ वातावरण असल्यामुळे नव्या चेंडूने गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजांना स्विंगची मदत मिळू शकते. त्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजांना सावधपणे खेळावे लागेल.

चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी

टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने चाहत्यांची निराशा झाली होती. मात्र, पहिल्या वनडेसाठीचा हवामान अंदाज पाहता क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. पावसाचा मोठा अडथळा येण्याची शक्यता नसल्याने रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि इंग्लंडच्या स्टार खेळाडूंची रंगतदार लढत पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता सर्वांचे लक्ष एजबेस्टनवरील या सामन्याकडे लागले असून, हवामानाची साथ मिळाल्यास भारत-इंग्लंड वनडे मालिकेची दमदार सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन : जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग आणि आदिल रशीद.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव

IND vs ENG ODI मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

14 जुलै 2026 : पहिला ODI, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम (3:30 दुपारी)16 जुलै 2026 : दुसरी वनडे, सोफिया गार्डन्स, कार्डिफ (5:30 संध्याकाळी)19 जुलै 2026 : तिसरा एकदिवसीय, लॉर्ड्स, लंडन (3:30 संध्याकाळी)

हे ही वाचा -

IND vs ENG 1st ODI : पहिल्या वनड्यापूर्वी इंग्लंडचा मोठा दणका! टीम इंडियाला हादरवणारी Playing XI अखेर जाहीर, कोण आहेत 'ते' 11 खेळाडू?