IND vs ENG बर्मिंघम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी 20 मालिका गमावल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडिया आज मैदानावर उतरली. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह सारखे दिग्गज संघात असल्यानं त्याचा परिणाम पाहायला मिळाला. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला जोरदार धक्के दिले आहेत. 61 धावांवर एकही विकेट न गमावणाऱ्या इंग्लडची अवस्था 5 बाद 80 अशी झाली होती. जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी इंग्लंडला धक्के दिले. 

Continues below advertisement

IND vs ENG: गोलंदाजांचा इंग्लंडला दणका

इंग्लंडनं टॉस जिंकून सावध सुरुवात केली होती. बेन डकेट आणि  जेकब बेथेल यांनी 61 धावांची भागीदारी केली. इंग्लंडची पहिली विकेट गुरनूर ब्रार यानं 13 व्या ओव्हरमध्ये काढली. गुरनूर ब्रारनेच इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केलं. बेन डकेट 43 धावा करुन बाद झाला तर जेक बेथल 14 धावा करुन बाद झाला. यानंतर शुभमन गिलनं जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला परत बोलावलं आणि इंग्लंडच्या कॅप्टन हॅरी ब्रुकची विकेट काढली. हॅरी ब्रुक 1 रन करुन बाद झाला. तर, यानंतर प्रसिद्ध कृष्णानं 17 व्या ओव्हरमध्ये जोस बटलर आणि सॅम करन यांना बाद केलं. यामुळं इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला. जोस बटलरनं 5 धावा केल्या तर सॅम करन याला खातं उघडता आलं नाही. शिवम दुबे यानं विल जॅक्सनला 20 धावांवर बाद करत भारतानं इंग्लंडला सहावा धक्का दिला. 

टीम इंडियाची प्लेइंग-11 : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, गुरनूर ब्रार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.

Continues below advertisement

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन : जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन, जोश टंग आणि आदिल रशीद.

 टीम इंडियाकडे टी 20 तील पराभवाचा वचपा काढण्याची संधी 

भारताला इंग्लंड विरोधातील टी 20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. टी 20 मालिकेत भारताला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. आता सहा महिन्यांच्या कालावधीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाकडून एकत्र वनडे सामना खेळत आहेत. विराट कोहली दुखापतीमुळं अफगाणिस्तान विरोधात खेळला नव्हता. जसप्रीत बुमराह वनडे वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय सामना खेळतोय. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांच्यासारखे अनुभवी खेळाडू टीम इंडियात आहेत. त्यामुळं  भारत पहिला वनडे सामना जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे जोस बटलर 200 वा एकदिवसीय सामना खेळत आहे.