IND vs AUS, WTC Final 2023- Innings Highlights: अजिंक्य रहाणे आणि लॉर्ड शार्दूल ठाकूर या मुंबईकर खेळाडूंच्या फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने फॉलोऑन टाळलाय. अजिंक्य रहाणे याने 89 तर शार्दूल ठाकूर याने 51 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. तिसऱ्या दिवशी भारताचा डाव 296 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडे अद्याप 173 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. 


तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर बोलँड याने केएस भरत याला तंबूत पाठवत भारताच्या अडचणी वाढवल्या. भरत याला फक्त पाच धावांचे योगदान देता आले. भारतीय संघावर फॉलोऑनचं संकट उभे ठाकले होते, त्यावेळी खडूस मुंबईकर धावून आले. अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मुंबईकर फलंदाजांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. पहिल्या सत्रात यांनी नाबाद 100 धावांची भागिदारी केली. पण दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर रहाणेला बाद करत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले. 


अजिंक्य रहाणे याने 129 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि 11 चौकार लगावले. तर शार्दूल ठाकूर याने 109 चेंडूत 51 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चौकारांचा समावेश होता. या जोडीने सातव्या विकेटसाठी 109 धावांची भागिदारी केली. टीम इंडियाकडून ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. दुसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांनी 71 धावांची भागिदारी केली होती. आज रहाणे आणि शार्दूल यांनी शतकी भागिदारी करत फॉलोऑन टाळला. 


अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी  कोसळली. शार्दूल ठाकूर याने एकाबाजूने धावा जमवल्या, पण अर्धशतकानंतर तोही बाद झाला. उमेश यादव 5 आणि मोहम्मद शमी 13 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड आणि कॅमरुन ग्रीन यांनी प्रत्येकी दोन दोन बळी घेतले. नॅथन लायन याने एक विकेट घेतली. 


दुसऱ्या दिवसाअखेर भारताची स्थिती कशी होती ?
जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलमध्ये टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद 151 अशी घसरगुंडी उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अजिंक्य रहाणे 29 धावांवर आणि श्रीकर भरत 5 धावांवर खेळत होते. या कसोटीत ऑस्ट्रेलियानं तीन बाद 327 धावांवरून पहिल्या डावात सर्व बाद ४६९ धावांची मजल मारली. भारताकडून मोहम्मद सिराजनं 108 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. पण भारतीय गोलंदाजांच्या या कामगिरीला भारतीय फलंदाजांना न्याय देता आला नाही. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात माघारी परतले. अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जाडेजानं 71 धावांची झुंजार भागीदारी रचली. पण नॅथन लायननं जाडेजाला माघारी धाडून ही जोडी फोडली. त्यामुळं टीम इंडियासमोर फॉलोऑनचा धोका कायम आहे. भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान 270 धावांची मजल मारण्याची गरज आहे. त्यासाठी टीम इंडियाला अजूनही 119 धावांची आवश्यकता आहे. टीम इंडिाय अद्याप 318 धावांनी पिछाडीवर आहे. सध्या अजिंक्य रहाणे आणि केएस भरत मैदानावर आहेत.