IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौर्यावर पुन्हा एकदा भारतीय खेळाडूंसोबत गैरवर्तन करण्यात आलं आहे. ब्रिस्बेनच्या गाब्बा मैदानावर खेळल्या जाणार्या चौथ्या कसोटी सामन्यात काही प्रेक्षकांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरला उद्देशून अपशब्द वापरले आहेत. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या बातमीतून ही माहिती उघड झाली आहे.
मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर फिल्डिंगसाठी बाऊंड्री लाईनवर उभे असताना हा सगळा प्रकार घडला आहे. काही प्रेक्षक जोरजोरात दोघांना उद्देशून शिवीगाळ करत होते. दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियन दर्शकांनी अपशब्द वापरले आहेत.
सिडनी कसोटीतही खेळाडूंसोबत गैरवर्तन
यापूर्वी सिडनी येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांनी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना उद्देशून वर्णद्वेषाचे भाष्य केले होते. या दोघांनीही याबाबत पंचांकडे तक्रार केली होती. यानंतर, दुसऱ्या डावातही प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजला शिवीगाळ केली होती. त्यानंतर सुमारे 10 मिनिटे खेळ थांबवावा लागला होता. त्यावेळी सहा प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढण्यात आलं होतं.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा माफीनामा
भारतीय खेळाडूंशी गैरवर्तन केल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही दिलगिरी व्यक्त केली होती. यासह ऑस्ट्रेलियन संघाचा प्रशिक्षक जस्टीन लँगर आणि कर्णधार टिम पेन यांनीही ही घटना लाजिरवाणी असल्याचं म्हटलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी ) क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निषेध केला होता आणि हा भेदभाव सहन करणार नाही असं म्हटलं होतं. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.
चौथ्या कसोटीचा पहिला दिवस
गब्बाच्या वेगवान विकेटवर ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली आणि अवघ्या 13 धावांच्या मोबदल्यात त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले. पण यानंतर मार्लनस लब्युचेन 108, स्टीव्ह स्मिथ 36 आणि मॅथ्यू वेड 45 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाच विकेटच्या मोबदल्यात 274 धावा केल्या आहेत. कर्णधार टिम पेन 38 आणि कॅमेरून ग्रीन 28 धावांवर खेळत आहेत. टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजनने भारताकडून सर्वाधिक दोन गडी बाद केले. याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.