IND vs AUS 4th Test : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल अनिर्णीत राहिला आहे. कारण सामन्यासाठी मिळणाऱ्या पाचही दिवसांचा खेळ संपल्यावरही निकाल समोर न आल्याने सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. पण मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे मालिका भारताने 2-1 ने जिंकत बॉर्डर-गावस्कर (BGT 2023) ट्रॉफीही खिशात घातली आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजी घेतलेल्या ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करत तब्बल 480 धावा स्कोरबोर्डवर लावल्यावर भारतानं चोख प्रत्यूत्तर देत शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या शतकाच्या मदतीनं 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. ज्यानतंर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ 175 धावा केल्यावर दिवसाचा खेळ संपला ज्यामुळे कसोटी सामना अनिर्णीत राहिला.
सामन्याचा लेखा-जोखा
सामन्यात सर्वात आधी टॉस जिंकत ऑस्ट्रेलियानं फलंदाजी निवडली. एक मोठी धावसंख्या करण्याचा त्यांचा डाव होता. उस्मान ख्वाजा आणि ग्रीन यांच्या शतकाने तो डाव पूर्णही झाला. उस्मान ख्वाजाने 180 धावा केल्या. ख्वाजा याने 422 चेंडूचा सामना करताना 21 चौकारांच्या मदतीने 180 धावा केल्या. तर ग्रीन याने 114 धावांची खेळी केली. याशिवाय मर्फीने 34, ट्रॅविस हेड 32, स्मिथ 38 यांनीही धावा करत आपआपलं योगदान दिलं. दरम्यान या डावात भारताकडून आर. अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमीने दोन आणि जाडेजा, अक्षर पटेलने प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 480 धावांवर संपुष्टात आल्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली भारताला करुन दिली. पण तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर रोहित शर्मा 35 धावा करुन बाद झाला. मग पुजारा गिलने चांगली भागिदारी केली. पण पुजारा 42 धावा करुन बाद झाला.मग गिलनं शतक पूर्ण केलं 128 धावांवर तो बाद झाल्यावर कोहली संयमी खेळी करत होता. जाडेजासोबत त्यानं चांगली पार्टनरशिप केली. 28 धावांवर जाडेजा बाद झाला. मग श्रीकर भरत 44 रनांवर तंबूत परतल्यावर अक्षर पटेलंन दमदार अशी 79 धावांची खेळी केली. त्यानंतर अश्विन 7 उमेश यादव 0 धावांवर बाद झाल्यावर अखेर कोहली 186 रनांवर बाद झाला. दुखापतीमुळे श्रेयस अय्यर फलंदाजी करु शकला नाही. ज्यामुळे भारतानं 571 धावा करत 91 धावांची आघाडी घेतली. मग फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियानं सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी सुरु ठेवली. ट्रॅव्हिस हेडच्या 90 आणि लाबुशेनच्या नाबाद 63 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 175 धावा दोन विकेट्स गमावत केल्या. पण तोवर 5 दिवसाचा खेळ संपला ज्यामुळे कसोटी सामना अनिर्णीत राहिला.
हे देखील वाचा-