IND vs AUS, 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला. सर्व आघाडीचे फलंदाज साफ फेल झाले असून टेस्ट स्पेशल फलंदाज चेतेश्वर पुजारा अवघी एक धाव करुन बाद झाला. विशेष म्हणजे आजही त्याला नॅथन लायन यानेच बाद केलं आहे. आजच्या या विकेटसह कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 12 वेळा पुजारा लायनच्या फिरकीचा शिकार झाला आहे. दरम्यान पुजाराच्या अशाप्रकारे सतत लायनकडून बाद होण्यावर भारतीय चाहते भडकले असून सोशल मीडिया पोस्टमधून नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही खास कामगिरी न केल्याने पुजाराच्या संघात असण्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.


आजवरचा पुजारा आणि लायनचा इतिहास पाहिला तर पुजाराने कसोटी सामन्यांमध्ये लायनविरुद्ध 532 धावा केल्या असून एकूण 12 वेळा या ऑफ स्पीनरनं पुजाराला तंबूत धाडलं आहे.याआधी देखील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजाराला लायनचं बाद केलं होतं.तो सामना भारतानं 6 विकेट्सनी जिंकला. पण या संपूर्ण मालिकेतील पुजाराचा खराब फॉर्म हा त्याच्यासाठी चिंतेचा विषय आहे. संघातील त्याचं स्थान यामुळे धोक्यात आलं आहे.


घरच्या मैदानावर पुजारा पुन्हा फेल


देशांतर्गत मैदानावर पाहिलं तर चेतेश्वर पुजारा 2019 च्या सुरुवातीपासून 27.42 च्या सरासरीनेच धावा करू शकला आहे. यादरम्यान त्याला 20 डावात केवळ 6 अर्धशतकं झळकावता आली. त्याने मागील 13 कसोटी डावात एक अर्धशतक झळकावलं आहे. त्याने शेवटचं अर्धशतक 2021 मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध केलं होते. इंदूर कसोटीबद्दल बोलायचं झालं तर भारताच्या पहिल्या डावात तो सपशेल अपयशी ठरला आहे. आज पुजाराने केवळ 1 धाव केली असून दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात त्याला खातंही उघडता आलं नाही. दोन्ही वेळा लायननं त्याला बाद केलं.


चेतेश्वर पुजाराच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याला सुमारे चार वर्षात त्याला केवळ 2 शतकं करता आली आहेत. जानेवारी 2019 मध्ये, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत 193 धावांची इनिंग खेळली होती. त्यानंतर त्याला शतक झळकावण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. डिसेंबर 2022 मध्ये पुजाराला बांगलादेशविरुद्ध शतक झळकावण्यात यश आलं. त्याचवेळी, त्याला गेल्या तीन कसोटीतील 5 डावात केवळ 68 धावा करता आल्या आहेत. त्याची कामगिरी पाहून बीसीसीआय लवकर त्याला पर्यायी फलंदाज शोधू शकते. 


 हे देखील वाचा-